Mumbai News – मुंबई विमानतळावर साडेसात किलो सोने जप्त, कंत्राटी कर्मचाऱ्यांसह आठ जणांना अटक

मुंबई सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करत 7.465 किलो तस्करीचे सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 5.113 कोटी रुपये आहे. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. प्रवाशांकडून आणि विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून हे सोने जप्त करण्यात आले.

पहिल्या प्रकरणात दुबई आणि मादागास्कर येथून आलेल्या तीन प्रवाशांना सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडवलं. त्यांच्याकडे एकूण 4.655 किलो 24 कॅरेट सोने आढळून आले. या सोन्याची किंमत 3.183 कोटी रुपये आहे.

हे सोने चलाखीने प्रवाशांच्या अंगावर आणि त्यांच्या पॅन्टच्या खिशात लपवल्या होत्या. मात्र सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांची चलाखी पकडली आणि दोन प्रवाशांना अटक केली.

दुसऱ्या कारवाईत विमानतळावर निर्गमन क्षेत्रात काम करणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना सोन्याची तस्करी करताना पकडले. त्यांच्याकडून मेणाच्या सात पाउचमध्ये लपवलेले 2.81 किलो 24-कॅरेट सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत 1.93 कोटी रुपये आहे. आरोपींनी अंडरवियर आणि ट्राउझरच्या खिशात हे सोने लपवून ठेवले होते.

सोने तस्करीच्या नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या सहाही कंत्राटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.