मंत्रीमंडळ बैठकीची वर्षपुर्ती ! राज्य सरकारने दाखवला मराठवाड्याला ठेंगा

ajit-pawar-shinde-fadnavis

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 16 सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याचा विकासासाठी 46 हजार 579 कोटी रुपयांच्या योजना जाहीर केल्या. यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीची वर्षपूर्ती झाली, मात्र विकासकामे कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्याला ठेंगा दाखविण्याचा सपाटा या सरकारने चालू केल्याचे दिसून येत आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, नियोजन, ग्रामविकास, पशुसंवर्धन, पर्यटन आदींच्या विविध कामांची घोषणा करण्यात आली. मात्र, यातील काही योजनांच्या संदर्भात तुरळक निधी उपलब्ध करून अन्य ठिकाणी केवळ प्रस्ताव सादर करण्याचा, निधी मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा अशा प्रकारची बगल देऊन मराठवाड्याची क्रूरचेष्टा करण्यात आली आहे. मराठवाड्यातील 76 तालुक्यांतून शाळा निवडण्याची घोषणा केल्यानंतर यासाठी 95 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली. तसेच मराठवाड्यातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती, पुनर्बाधणी करण्यासाठी दोनशे कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, स्वातंत्र्यसेनानींच्या गावांतील शाळांची माहिती सादर करणे व प्रस्ताव सादर करणे एवढेच काम प्रशासनाने गेल्या 11 महिन्यांत केले असून, अद्यापही यासाठी निधी उपलब्ध झाला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मराठवाड्यातील विविध स्मारके, प्रसिध्द मंदिरांचा विकास यासाठी 253 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातील काहींच्या दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर असल्याचे नमूद करण्यात आले असून, मनकेश्वर (ता. भूम) येथील महादेव मंदिर, जागजी (ता. धाराशिव) येथील महालक्ष्मी मंदिर, चारठाणा (ता. जिंतूर) येथील गोकुळेश्वर मंदिर व मठ, जैन स्तंभ, गणेश मंदिर, जोड महादेव मंदिर, खुराचीआई मंदिर यांचे केवळ प्रस्ताव सादर करून ते मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, त्यासाठी कवडीचाही निधी प्राप्त झाला नाही. धारासूर (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील गुप्तेश्वर मंदिर भाग-1 व 2 यासाठीचाही प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, त्याला त्याला मंजुरी किंवा निधी प्राप्त झाला नाही. दुसरीकडे होट्टल (ता. देगलूर) येथील सिध्देश्वर मंदिर, पार्वती मंदिर, नंदी मंदिर येथील दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे या अहवालात म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी 135.65 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. माहूरच्या सरोवर पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पासाठी 24.62 कोटी रुपये शासनाने मंजूर केले. त्यातील काही निधी प्राप्त होऊन त्यावर खर्च झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. नव्या पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्रामाची माहिती व्हावी यासाठी छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथील विद्यापीठांत वास्तू संग्रहालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली, मात्र दोन्ही विद्यापीठांनी अद्यापही प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले आहे.