जेएनपीएच्या प्रचंड भरावाने न्हावा-शेवा खाडीची मुस्कटदाबी

नियम धाब्यावर बसवून जेएनपीएकडून केल्या जाणाऱ्या प्रचंड भरावाने न्हावा शेवा खाडीची अक्षरशः मुस्कटदाबी झाली आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी आवाज उटवूनही प्रशासन ढिम्म असून भरावामुळे खाडीचे मुख 1500 मीटर रुंदीवरून चक्क 100 मीटर अरुंद झाले आहे. यामुळे भरतीचे संतुलन आणि प्रवाह बिघडला असून जैवविविधता, मासेमारी, खारफुटी धोक्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात पर्यावरण संघटनेने याचिका दाखल करून खाडी बुजवण्याचा कारभार रोखावा अशी मागणी केली आहे.

ठाण्याची उपखाडी म्हणून न्हावा शेवा खाडी ओळखली जाते. या खाडीच्या मुखाशी जेएनपीएने बंदराचा विस्तार केला आहे. या परिसरातील 520 हेक्टर पारंपरिक खाजण क्षेत्रात दगड, मातीचा भराव घालून ते जवळपास 94 टक्के बंद केला आहे. यामुळे खाडीचे पात्र अरुंद झाले आहे. याचा विपरीत परिणाम येथील स्थानिक पारंपरिक मच्छीमारांबरोबरच जैवविविधतेवरही झाला आहे. खाडीचे मुख बंद केल्याने समुद्राच्या नैसर्गिक भरती व सागरी प्रवाहाचे संतुलन बिघडले असून अरबी समुद्रातील या खाडी क्षेत्रात येणारे भरतीचे पाणी व भरतीचे वेग प्रचंड मंदावला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

माशांची पैदास घटली: खारफुटी मरणपंथाला समुद्रातून खाडी क्षेत्रात येणारी माशांची आवक व पैदासही घटली आहे.
नैसर्गिक प्रवाह खंडित झाल्याने माशांच्या प्रजनन क्षेत्रात व माशांच्या खाद्याच्या ठिकाणी प्रचंड गाळ जमा झाला. त्याचबरोबर 200 चौरस किलोमीटर परिसरातील कांदळवन क्षेत्रात नैसर्गिक भरतीचे पाणी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाल्याने खारफुटीच्या वनस्पती मरणपंथाला लागल्या आहेत.

याचिकेची गंभीर दखल घेऊन हरित न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेशकुमार सिंह आणि डॉ. विजय कुलकर्णी यांनी संबंधित विभागाला तातडीने पडताळणी करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. तसेच याप्रकरणी तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याच्या प्रस्तावालाही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी संमती दर्शवली आहे.