>>धनंजय साठे
टीव्ही मालिका, सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रातील प्रवासात अनेक सहप्रवासी बरंच काही शिकवून गेले. अनेक जणांशी आजही इतक्या वर्षांची मैत्री घट्ट आहे. त्यांच्या सहवासात माझी प्रतिभा आणि प्रतिमा फुलली, परिपक्व झाली. अशा या अनुभवांनी परिपूर्ण असलेल्या हरहुन्नरी लोकांनी बरंच काही शिकवलं.
22 नोव्हेंबर 2000 ही तारीख मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कारण हा दिवस माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी देणारा ठरला होता. याच दिवशी मी पहिल्यांदा नीना गुप्तांच्या निर्मिती संस्थेत पाऊल ठेवलं होतं. एखाद्या सासरी आलेल्या मुलीसारखं मला अनोळखी असलेल्या टीव्ही जगतामध्ये पाऊल ठेवलं आणि बघता बघता त्या विश्वात मी रमून गेलो. या प्रवासात अनेक सहप्रवासी भेटले जे बरेच काही शिकवून गेले. अनेक जणांशी आजही इतक्या वर्षांची मैत्री घट्ट आहे. त्यातली काहींच्या सहवासात माझी प्रतिभा आणि प्रतिमा दोन्ही फुलली, परिपक्व झाली… त्यांच्याबद्दल…
नीना गुप्ता… माझी पहिली बॉस. पाच वर्षे त्यांच्यासोबत काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. कामाच्या प्रति त्यांची असलेली निष्ठा, प्रेम, शिस्त आणि आदर याचं बाळकडू मला नीनाजींच्या संस्थेत मिळालं.
मृणाल कुलकर्णी… जेव्हा मी नीना गुप्ता यांच्या निर्मिती संस्थेत काम सुरू केले तेव्हा त्यांची ‘साँस’ ही मालिका स्टारप्लसवर तुफान चालू होती. त्याचदरम्यान ‘सोनपरी’ नावाच्या मालिकेचीसुद्धा तयारी चालू होती. ज्या दिवशी मृणालची लूक टेस्ट होती, त्या दिवशी चॅनलचे लोकसुद्धा ऑफिसमध्ये आले होते. नीना गुप्ता आणि त्यांचे पार्टनर अनुपमजी होते. मला त्या लूक टेस्ट आणि नंतर होणाऱ्या मीटिंगमध्ये हजर राहण्याचे आदेश होते. काही क्षणांतच मृणाल कुलकर्णी सोनपरीच्या वेषात आली आणि सगळे जण ‘आ’ वासून बघतच राहिले. इतकी ती सुंदर दिसत होती. नीनाजी सहज बोलून गेल्या “अरे, तुम तो बिलकुल परी लग रही हो!’’ नंतर मृणालची ‘सोनपरी’ अजरामर झाली.
काही क्षणांनी आमची ओळख करून देण्यात आली. जेव्हा मृणालला समजलं की, तिथल्या हिंदी वर्तुळात मी एकमेव मराठी तरुण आहे. त्या क्षणापासून आमची झालेली मैत्री आज 24 वर्षांनंतरही टिकून आहे. किंबहुना अधिकाधिक दृढ होत गेली आहे. एक गमतीचा किस्सा आठवतो मला. एक दिवस मृणाल ऑफिसमध्ये ‘सोनपरी’चा एपिसोड बघायला आली होती. एपिसोड बघून झाल्यावर गप्पांच्या ओघात कळलं की, मृणालला एका दुकानाच्या उद्घाटनासाठी गुजरातमधून बोलावणं आलंय. दोन-तीन दिवस झाले तरी त्या लोकांचा होकार-नकार, काहीच आला नव्हता. तसंच तिलाही फार अपेक्षा नव्हती. मी तिला म्हणालो, “त्या लोकांचा होकार लवकरच येईल.’’ ती “नाही’’ म्हणत होती. गंमत म्हणून आमची पैज लागली. जो हरेल तो आईक्रीम देणार. दुसऱ्याच दिवशी तिला कॉल आला आणि मी पैज जिंकलो. ठरल्याप्रमाणे मी आईक्रीमची मागणी केली. ते साल होतं 2001. आज-उद्या करत शेवटी आम्ही नागपूरला लहान मुलांच्या एका कार्यक्रमासाठी एकत्र गेलो होतो, तेव्हा परतताना नागपूरच्या विमानतळावर मृणालने माझ्या पैजेचं आईक्रीम दिलं. साल होतं 2018. अशा अनेक आठवणींचा साठा माझ्याकडे आहे आणि मला माझ्या या कर्तबगार, सुंदर मैत्रिणीचा खूप अभिमान वाटतो.
महेश मांजरेकर… हे व्यक्तिमत्त्व म्हणजे एक महाशब्द कोडं म्हणावं असं आहे. टॅलेंटेड, हरफनमौला व्यक्तिमत्त्व असणारे महेश मांजरेकर! महेशजींना मी पहिल्यांदा त्यांच्या घरी भेटलो ‘बंध नायलॉनचे’ या फिल्मची गोष्ट ऐकवायला गेलो होतो तेव्हा. खूप आशेने आम्ही मांजरेकरांकडे गेलो होतो आणि महेशजींनी आम्हाला नाराज केलं नाही. पुढे सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं आणि त्याचं लोकेशन कोकणात होतं. त्याच सुमारास मांजरेकरांचं अजून एका सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं. ते संपवून ते आणि मेधाताई (ज्या त्यांच्या बायकोच्या भूमिकेत होत्या) दुसऱ्या दिवशी पहाटे कोकणात येणार होते. ही पार्श्वभूमी अशासाठी की, अनुभव ही काय चीज असते ती येणाऱ्या घटनांमधून सिद्ध होणार होती.
रात्री मी मांजरेकरांना कॉल केला. कारण त्यांच्या सोबत मी येणार होतो. मेधाताईंनी कॉल घेतला आणि म्हणाल्या, आपण सकाळी 4.30 पर्यंत निघू. म्हणजे नऊच्या शिफ्टपर्यंत पोहोचू. दुसऱया दिवशी पहाटे 4.15 वाजेपर्यंत मी त्यांच्या माहीमच्या गल्लीत त्यांचं घर शोधत होतो. पहाटेच्या अंधारात घर काही सापडेना. मी मांजरेकरांना कॉल केला तर ते झोपेत होते. दोन-तीन कॉल केल्यानंतर फोन उचलला. शिव्या हासडत “लोकांना पहाटे कॉल करून त्रास काय देतोस…’’ अशी सुरुवात केली. मी त्यांना म्हणालो, “साडेचार वाजता कोकणात निघायचं आपलं ठरलंय ना, मी तुमचं घर शोधतोय.’’ मग मांजरेकरांनी अजून एक बॉम्ब टाकला. माहीम नाही तू शिवाजी पार्कच्या फ्लॅटवर ये. आम्ही तिथे आहोत. मी तिथे पोहोचलो आणि दारावरची बेल वाजवली. काही क्षण भयाण शांतता. मी एकटाच मांजरेकरांच्या दारात उभा. काही मिनिटांनी पुन्हा बेल वाजवणार इतक्यात दार उघडण्याचा आवाज आला. माझ्या जिवात जीव आला. दाराच्या फटीतून पाहिलं तर एक केस विस्कटलेल्या बाईचा चेहरा दिसला. झोपमोड झाल्यामुळे चिडलेल्या आवाजात तिने “कोण पाहिजे?’’ असं दरडावून विचारलं. “मी महेशजींना घेऊन शूटवर जाण्यासाठी…’’ वाक्य पूर्ण व्हायच्या आत ती घरात निघून गेली. मी अंधुक उजेडात चाचपडत डायनिंग टेबलपर्यंत पोहोचलो. तिथे एकटाच अंधारात बसलो. मला वाटलं, महेशजी तयार होऊन कोणत्याही क्षणी बाहेर येतील. किती चुकीचा विचार होता तो! माझ्या डोळ्यांदेखत दिवस उजाडला. साडेपाच वाजले. तासभर मी अंधारात एकटाच बसून होतो. मग सहा वाजले. चिपळूणवरून माझ्या दिग्दर्शकाने फोन केला आणि खूप आशेने विचारलं, “कुठपर्यंत पोहोचलात?’’ मी त्याला परिस्थिती समजावून सांगितली. तो टेन्शनमध्ये आला… “तुम्ही निघणार कधी आणि काम सुरू होणार कधी?’’
तेवढ्यात महेशजी बाहेर आले आणि मला चिडवायला लागले. “काय साठे, पहाटे पहाटे लोकांकडे जाऊन बसतो…’’ वगैरे. मी त्यांना म्हणालो, “आपण 4.30 ला निघणार होतो. आता सहा वाजलेत.’’ तेवढ्यात मेधाताई तयार होऊन आल्या आणि पोहे करण्यासाठी किचनच्या दिशेने गेल्या. मी आलोच म्हणत मांजरेकर आत निघून गेले. मला काहीच समजत नव्हतं. अंदाजे सात वाजता आम्ही शिवाजी पार्कमधून निघालो आणि 11 वाजता कोकणात लोकेशनवर पोहोचलो. सबंध प्रवासात माझी असंख्य वेळा रामरक्षा आणि हनुमान चालिसाची पारायणं करून झाली. चित्रीकरण सुरू झालं. मांजरेकरांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, “माझे केस उन्हात नाही पांढरे झाले. इतक्या वर्षांचा अनुभव आहे.’’ संपूर्ण चित्रीकरण उत्तमरीत्या आणि वेळेत पार पडलं.
अनुभवाने परिपूर्ण असलेले असे हरहुन्नरी कलाकार बरंच काही शिकवून जातात.
– [email protected]
(लेखक क्रिएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)