जिल्हा परिषदेच्या विकासकामांकरिता ठेकेदारांसाठी आता ऑनलाइन लॉटरी काढण्यात येणार असून चिठ्यांचा खेळ खल्लास होणार आहे. झेडपीच्या बांधकाम विभागातील 10 लाखांच्या आतील विकासकामांसाठी यापुढे विनास्पर्धा ऑनलाइन लॉटरी काढण्यात येणार असल्याने कामे फास्ट होणार आहेत. दरम्यान, आता ठेकेदारांची लॉबी पद्धत मोडीत निघणार असून महाराष्ट्रात पहिल्यांदाच पेमेंट गेटवेचा वापर ठाणे जिल्हा परिषदेत करण्यात येणार आहे.
ठाणे जिल्हा परिषदेत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनादेखील काम करण्याची संधी मिळणार असून 2024- 25 या वर्षातील 166 विकासकामांचे वाटप आज ऑनलाइन लॉटरी पद्धतीने करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे करण्याच्या उद्देशाने कामकाज करण्यात आले आहे. पुढील कामवाटप नियोजन ऑनलाइन लॉटरी पद्धतीने फेसबुक, यू ट्यूब, दूरदृश्य प्रणालीद्वारे लाईव्ह करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, उपकार्यकारी अधिकारी सुनील बच्छाव, आरेखक संजीव यशवंत, बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी, ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता उपस्थित होते.
पेमेंट गेटवे म्हणजे काय?
पेमेंट गेटवे हे एक तंत्रज्ञान व्यासपीठ आहे, जे इलेक्ट्रॉनिक आर्थिक व्यवहारांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करते. हे वैयक्तिक आणि ऑनलाइन व्यवसायांना विविध पेमेंट पद्धती स्वीकारण्यास, प्रक्रिया करण्यास आणि व्यवस्थापित करण्यास सक्षम करते. जसे की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि डिजिटल वॉलेट असून एक सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धत वापरण्यात आली आहे.