पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा राबविणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीने निर्माल्य व्यवस्थापनात आघाडी घेतली आहे. दीड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनावेळी १२ टन तर गौरीसह गणपती विसर्जनावेळी 13 टन असे एकूण जमा झालेले 25 टन निर्माल्याचे खत बनवले जाणार आहे. गणपती बाप्पा मोरया.. पर्यावरणाचा वारसा जपूया असा संदेश देत ठाणे पालिका आणि सामाजिक संस्थेच्या उपक्रमाला भक्तांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
शहरातील १५ कृत्रिम तलाव आणि नऊ विसर्जन घाटांवर दरवर्षी सफाईसेवक व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गणेशभक्तांकडून निर्माल्य व सजावटीचे साहित्य संकलित केले जाते. दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी सुमारे 12 टन निर्माल्य संकलन झाले होते, तर सहा दिवसांच्या गणेशमूर्ती व गौरी मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे 13 टन निर्माल्य संकलित झाले. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे.
विसर्जन घाटावर तैनात करण्यात आलेल्या वाहनांमध्ये या निर्माल्याचे जैविक व अजैविक असे वर्गीकरण केले जाते. वर्गीकृत कचरा स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून संयुक्तपणे कचरा व्यवस्थापनावर पाठवला जातो. यात जैविक कचऱ्यातून खतनिर्मिती केली जाते तर, अजैविक कचऱ्यात असलेल्या प्लास्टिक, कागद, काच आदींसारखे घटकदेखील प्रकल्पातील पुनर्निर्माणमध्ये शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी पाठवले जातात.
जलप्रदूषण टळणार
लाडक्या गणरायाच्या पूजेप्रसंगी वाहिलेली फुले, हार तसेच बेल, शमी, दुर्वा, रुई इत्यादी पवित्र वनस्पती तसेच अन्य पूजा सामग्री, दुसऱ्या दिवशी निर्माल्य होते. या निर्माल्याचे तलावात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याची पारंपरिक पद्धत असली तरी जलप्रदूषण टाळण्यासाठी हे निर्माल्य संकलित करून त्याचे रूपांतर खतामध्ये केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.