व्हीआयपींच्या घरांसाठी सल्लागाराच्या घशात 28 कोटी रुपये; सिडकोची उधळपट्टी थांबता थांबेना

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे विकण्यासाठी सुमारे 700 कोटी रुपयांचा ठेका दिल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सिडकोने आता पुन्हा व्हीआयपींच्या घरांसाठी सल्लागाराची नियुक्ती करून नवीन वाद उभा केला आहे. या प्रकल्पात सुमारे साडेतीनशे घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी सिडको चक्क 28 कोटी रुपये सल्लागार कंपनीला देणार आहे. विशेष म्हणजे या सल्लागार शुल्कानंतर सिडकोकडून या प्रकल्पाच्या आर्किटेक्टवरही 15 कोटी रुपयांची खैरात केली जाणार आहे. सिडकोची उधळपट्टी थांबण्याचे नाव घेत नसल्याने नवी मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सिडकोने नवी मुंबईमध्ये खासदार, आमदार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी मोठे गृहनिर्माण संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बेलापूर येथील सेक्टर १५ मध्ये पामबिच मार्गावर उभे राहणारे हे संकुल बांधकामपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या संकुलात एकूण ३५० घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामध्ये श्री बीएचके आणि फोर बीएचके घरांचा समावेश असणार आहे. या घरांची किंमत दोन कोटींपासून तीन कोटींपर्यंत ठेवण्यात येणार आहे. या गृहनिर्माण प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत घेण्यात आला. त्यानुसार दोन कंपन्यांचा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सल्ल्यापोटी या दोन्ही कंपन्यांवर सुमारे २८ कोटी रुपयांची खैरात केली जाणार आहे.

43 कोटी रुपयांना दिली मंजुरी
व्हीआयपींच्या घरांचा मास्टर प्लॅन तयार करणे, प्राथमिक प्रकल्प अहवाल सादर करणे, प्रकल्पाचा अंदाजित खर्च किती आहे हे सांगणे, आर्किटेक्चरल काम, अभियांत्रिकी आणि सेवांचे डिझाईन, मेकॅनिक प्लम्बिंग, अग्निसुरक्षा या सेवांचे नियोजन करण्यासाठी सिडकोच्या संचालक मंडळाने तब्बल 43 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. आर्किटेक्ट म्हणून हाफीज कॉण्ट्रॅक्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामाचा मोबदला म्हणून त्यांना 15 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. सल्लागारावर मात्र 43 कोटींची खैरात होणार आहे. सल्लागार म्हणून टाटा कन्सल्टिंग इंजिनीयर्स आणि जेव्ही या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.