घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचाराचा खटला एकाच कोर्टात चालणार, हायकोर्टाचा निर्वाळा

घटस्फोट व कौटुंबिक हिंसाचाराचा खटला एकाच कोर्टात चालणार असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्वाळा देत न्यायालयाने गिरगाव महानगर दंडाधिकारीसमोरील कौटुंबिक हिंसाचाराचा खटला वांद्रे कुटुंब न्यायालयात वर्ग केला.

पतीने यासाठी अर्ज केला होता. न्या. मिलिंद जाधव यांच्या एकल पीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने पतीचा अर्ज मंजूर केला. कुटुंब न्यायालयाने अति आवश्यक परिस्थितीतच सुनावणी तहकूब करावी, असे आदेशही न्या. जाधव यांनी दिले आहेत.

पत्नीचा विरोध

या अर्जाला पत्नीने विरोध केला होता. आमची एकूण चार प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. घटस्फोटासाठी वांद्रे न्यायालयात सुनावणी सुरु आहे. घराच्या मालकीचा दावा नगर दिवाणी न्यायालयात आहे. हा दावा सासूने दाखल केला आहे. बंगळूरु येथील घरात पत्नीला मनाई करावी, अशी मागणी करणारा स्वतंत्र अर्ज पतीने दाखल केला आहे. गिरगाव न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराची सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. कौटुंबिक हिंसाचार व घटस्फोटाचे खटले संबंधित कोर्टातच चालवले गेले पाहिजेत, असा दावा पत्नीने केला.

न्यायालयाचे निरीक्षण

कौटुंबिक हिंसाचार व घटस्फोटाचे खटले एकत्रित चालवले जावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. खटला वर्ग करताना पत्नीच्या हिताचा विचार केला जावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. या प्रकरणात दोन्ही खटल्यांची सुनावणी मुंबईतच सुरु आहे. एक वांद्रे न्यायालयात दुसरा गिरगाव दंडाधिकारी यांच्या समोर सुनावणी सुरु आहे. हे दोन्ही खटले एकाच कोर्टात चालवणे योग्य ठरेल, असे न्या. जाधव यांनी नमूद केले.