मुरुडमध्ये गणपती मिरवणुकीवर दगडफेक, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरात कर्फ्यू

भोगेश्वर पाखाडी परिसरात गणपती मिरवणुकीवर समाजपंटकांनी दगडफेक केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त भाविकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र दगडफेक करणारी अल्पवयीन मुले असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शेकडो भाविकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गर्दी पांगवत मुरुड शहरात कर्फ्यू लावला आहे. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी भोगेश्वर पाखाडी परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. याचदरम्यान दोन अल्पवयीन समाजपंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या घटनेनंतर भाविकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. मात्र दगडफेक करणारी 12 वर्षांखालील मुले असल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. पोलीस कारवाई करत नसल्याने संतप्त भाविकांनी मुरुड पोलीस ठाण्याच्या बाहेर एकच गर्दी केली. जोपर्यंत समाजकंटकांवर गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसण्याचा इशारा यावेळी भाविकांनी पोलिसांना दिला.