19 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास

मान्सूनच्या निरोपाची वेळ आता जवळ आली आहे. आणखी पाच दिवसांनंतर म्हणजेच 19 सप्टेंबरपासून मान्सून माघारी परतायला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदाच्या वर्षी देशावर वरुणराजाने चांगलीच कृपा केली. महाराष्ट्रासह देशभरात चांगला पाऊस झाला. एरव्ही कोरडाठाक होणारा मराठवाडा भिजून चिंब झाला. राज्यातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरली.

देशात सरासरी 772.5 मि.मी. पर्जन्यमान असते. या वर्षी 1 जूनला मान्सून दाखल झाल्यापासून आतापर्यंत 836.7 मि.मी. पाऊस झाला आहे. म्हणजेच आठ टक्क्यांनी हे प्रमाण जास्त आहे. धो-धो बरसलेला मान्सून 19 ते 25 सप्टेंबर या कालावधीत परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

सर्वसाधारणपणे मान्सून 1 जूनला केरळमध्ये पोहोचतो आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशात पसरतो. त्यानंतर त्याचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरच्या आसपास सुरू होतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून माघारी फिरतो. या वर्षी वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता.