स्वप्नाक्षय मित्र मंडळ ठरले सर्वोत्कृष्ट, पंचगंगा मंडळाने दुसरा तर युवक उत्कर्ष मंडळाने तिसरा क्रमांक पटकावला

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार’ या स्पर्धेत सात बंगला, अंधेरी (पश्चिम) येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळाने बाजी मारली आहे. 75 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. करी रोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने दुसऱ्या तर मालाड येथील युवक उत्कर्ष मंडळाने तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली. अनुक्रमे 50 हजार रुपये आणि 35 हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मुंबई महानगरात गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या माध्यमातून नागरी सेवासुविधा तसेच जनहितविषयक संदेश नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावेत, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दरवर्षी श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. आज उप आयुक्त (परिमंडळ-2) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी शुक्रवारी यंदाच्या पुरस्कारांची घोषणा केली. यंदा शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट श्रीगणेशमूर्तीचा पुरस्कार काजूवाडी (अंधेरी) येथील श्री गणेश क्रीडा मंडळास तर सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचे पारितोषिक पंकज मेस्त्री यांना भांडुप येथील साईविहार विकास मंडळाच्या श्रीगणेश मूर्तीसाठी जाहीर झाला.

सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचे पारितोषिक शिवाजी पार्क येथील शिवाजी पार्क हाऊस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सजावटीसाठी सुमित पाटील यांना जाहीर झाला. याव्यतिरिक्त अवयवदान जागृतीसाठी गिरगावातील धसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला तर पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी काळाचौकीतील रंगारी बदक रहिवासी संघ, सार्वजनिक उत्सव मंडळास आणि माझगाव येथील ताराबाग मंडळासदेखील पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय, 10 मंडळांना विशेष प्रशस्तिपत्रकेही जाहीर करण्यात आली आहेत.

यंदा या स्पर्धेचे 35 वे वर्ष असून यात 55 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता. प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेरींमध्ये ही स्पर्धा पार पडली. मंडळाने देखाव्यासाठी निवडलेला विषय, पर्यावरणपूरक मूर्ती, विषयाची मांडणी, मंडळाने केलेली सामाजिक कामे, परिसर स्वच्छता, पालिकेच्या विविध मोहिमा-कार्यांमध्ये नोंदविलेला सहभाग, पर्यावरणपूरकता, जनहित संदेशांचा वापर आदी बाबींचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला.