चला, गौरी-गणपतींचे विसर्जन झाले, मासे-मटणासाठी खवय्यांची गर्दी उसळली

ओले बोंबिल, ओला जवळा, पापलेट, सुरमई, खाडीची काळी कोळंबी, चविष्ट लाल कोळंबी, बांगडे, मुशी, काळ्या पाठीच्या चिंबोऱ्या… जिभा खवळलेल्या मत्स्यप्रेमींनी शुक्रवारी सकाळपासून मार्केटमध्ये कोळणी सांगतील त्या भावाने माशांची जोरदार खरेदी केली. गौरी-गणपतींना निरोप देण्यासाठी गुरुवारी जी गर्दी उसळली होती तेवढीच गर्दी आज शहर आणि उपनगरांमधील मासे, मटण मार्केटमध्ये उसळली होती.

श्रावणापासून भाव पाडून मासे विकणाऱया कोळणींच्या धारदार कातीला आज पापलेट, हलवा, सुरमई असे मासे कापताना उसंत नव्हती. ग्राहकांना, ये दादा, आवर ये… म्हणत हाकारायला, भाव सांगायला त्यांना फुरसद नाही आणि भाव करत बसलो तर समोरची ताजी फडफडीत मासळी हातातून जाण्याची भीती असे टेन्शन आज फिश मार्केटमध्ये घुसलेल्या प्रत्येकाच्या चेहऱयावर दिसत होते. नेहमीच्या कोळणींभोवती पडलेल्या गराडय़ातून किलो किलोची सुरमई, खापरी पापलेट, रावस चटाचट उचलले जात होते. डोक्यावरील घमेल्यात मासळी घेऊन फिरणाऱया विव्रेत्यांकडील मासळीही आज दुपारच्या आतच संपली होती. रोहू, कतला मासळीलाही मागणी होती.

श्रावणमासापासून जिभेला पडलेला उपवास सोडायचा म्हणून मांसाहारप्रेमी लोकांनी आज मार्केटमध्ये खिसापाकीट मोकळे करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. अनेकांनी वशाट खाऊन उपवास सोडायचा म्हणून मासे खरेदी करून मटण, चिकनही सोबतीला घेतले होते. चिकन सेंटरचे सकाळी काsंबडय़ांनी भरलेले पिंजरे अवघ्या तीन तासांत रिकामे झाले होते. तीच लगबग मटणाच्या दुकानांतही दिसत होती. मटण, कलेजी, वजडीसाठी खवय्ये रांगेतूनच ओरडून बुपिंग करत होते.

गौराईला तिखटाचा नैवेद्य

गौराई घरात येते तेव्हा कोकणवासीयांच्या अनेक घरांमध्ये तिखटाचा नैवेद्यही गौरीला दाखवला जातो. श्रावणमासापासून मांसाहार बंद असल्यामुळे चाललेला सक्तीचा उपवास असा गौरीच्या निमित्ताने सुटतो. गौरी-गणपतींचे श्रद्धापूर्वक विसर्जन झाल्यावर घरी मटण, मच्छी यापैकी काहीतरी बनवलेच पाहिजे अशी कर नावाची परंपरा अलिबाग परिसरात कटाक्षाने पाळली जाते. यामुळे अलिबागसह परिसरातील प्रमुख मासळी बाजारांतही गर्दी उसळली होती.

भाव भडकले, फिक्र नॉट

श्रावण संपल्यावरही अनेक घरांमध्ये गणपती विसर्जन होईपर्यंत मांसाहार केला जात नाही. त्यामुळे मासळीला भाव नव्हता, पण आज मार्केटमध्ये पुन्हा गर्दी होती. भाव भडकले, फिक्र नॉट अशा उत्साहात आमच्या नेहमीच्या ग्राहकांनी मासळी खरेदी केली, असे ठाण्याच्या कोपरी भागातील कविता कोळी या मासेविव्रेत्या ताईंनी सांगितले. एरव्ही शंभरला पाच बोंबील वा तीन ते चार बांगडे द्यायची वेळ येते. पण, आज हेच मासे 200 रुपयांना वाटा गेले. ओला जवळाही खवय्यांनी भरपूर खरेदी केला, असे त्यांनी सांगितले.

आजचे भाव (आकारानुसार, प्रति किलो)
पापलेट 600 ते 1000/1200 रु.
सुरमई 700 ते 900 रुपये
कोळंबी 400 ते 600 रुपये
हलवा 400 ते 500 रु.
रावस 500 रु.
बांगडा 3500 रु. एक टब
मासेविव्रेते अरुण साजेकर, ठाणे यांची माहिती