रुग्णालयातून रुग्णांनी घेतले बाप्पाचे दर्शन, व्हर्च्युअल रिऍलिटीची कमाल

लाडक्या बाप्पाचे दर्शन उत्सव मंडपात जाऊन घ्यावे, ही प्रत्येक गणेशभक्ताची इच्छा असते, मात्र आजारपणामुळे अंथरुणावर असलेल्या रुग्णांना हे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रिऑलिटीच्या माध्यमातून पुण्यातील ससून रुग्णालयातील रुग्णांना ते आहेत त्या विभागामध्ये, त्यांच्या खाटेवर बसून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन देण्यात आले.

‘व्हर्च्युअल रिऑलिटी’द्वारे आपण प्रत्यक्षपणे उत्सव मंडपात आहोत आणि गणरायाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत असल्याचा भास त्यांना होत आहे. तसेच आरती करीत असल्याचा आनंददेखील रुग्णांना मिळत आहे. या दर्शनाचा आनंद घेताना अनेक रुग्णांना आनंदाश्रू अनावर झाले. आपण लवकर बरे व्हावे यासाठी रुग्णांनी प्रार्थनादेखील केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाच्या 132 व्या वर्षी ‘व्हर्च्युअल रिऑलिटी स्टार्टअप – डिजिटल आर्ट व्हीआरई’ या माध्यामातून पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना बाप्पाचे दर्शन दिले जात आहे. डिजिटल आर्ट व्हीआरई चे संस्थापक संचालक अजय पारगे यांची ही संकल्पना आहे. आजारपणामुळे रुग्णालयातील खाटेवरुन कुठेही जाता न येणाऱ्या रुग्णांना गणेशोत्सवात लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्याची मनोमन इच्छा असते, मात्र इच्छा असूनही त्यांना विविध आजारांशी झुंज देत रुग्णालयात राहून केवळ मनामध्ये गणरायाचे रूप साठवावे लागते. अशा रुग्णांना ‘व्हर्च्युअल रिऑलिटी’द्वारे दर्शनाचा आनंद घेता येत आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ‘व्हर्च्युअल रिऑलिटी’द्वारे दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेण्याची संधी रुग्णांना उपलब्ध होत आहे. यामुळे रुग्णांना वेगळी ऊर्जा व समाधान मिळणार असून बाप्पाचा हा दर्शनरूपी प्रसाद ट्रस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मागील चार वर्षांपासून सातत्याने आम्ही हा उपक्रम ससून रुग्णालयामध्ये राबवित आहोत. त्याला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.