मुंबई पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीत एकमेकांचे गुण वाढविण्यासाठी शक्कल लढवणे सहा उमेदवारांच्या अंगाशी आल्याचे प्रकरण ताजे असतानाच कारागृह पोलीस भरती प्रक्रियेत देखील दोघा तरुणांनी 1600 मीटर धावणीमध्ये गुण वाढविण्याकरिता चीपची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पंतनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटकोपर पूर्वेकडील रेल्वे पोलिसांच्या मैदानात सध्या कारागृह पोलिसांसाठी मैदानी चाचणी सुरू असून राम गुंडेवार आणि श्रीधर पल्लेवाड हे दोघेही सहभागी झाले होते. परंतु त्यांनी 1600 मीटर धावणीवेळी गडबड केली. एकमेकांचे गुण वाढविण्यासाठी त्यांनी पायाला लावायला दिलेल्या चीपची अदलाबदल केली. मात्र मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक तपासणीत या दोघांनी गडबड केल्याचे पोलीस अधिकाऱयांना आढळून आले. त्यामुळे पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये धावणीत चीपची अदलाबदल केल्याप्रकरणी आतापर्यंत चार गुह्यांची नोंद करण्यात आली आहे.