हिंदुस्थानी संघ कसोटीच्या सरावासाठी घामाघूम

एक महिन्याच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया आगामी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी आणि टी-20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. सुरुवातीला होणाऱ्या कसोटी मालिकेची सुरुवात 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे होणार आहे. या सामन्यासाठी हिंदुस्थानी संघ जाहीर झाला असून टीम इंडियाचे खेळाडू नेटमध्ये कसून सराव करताना दिसत आहेत. पहिल्या सराव सत्रामध्ये विराट कोहली नेटमध्ये तब्बल 45 मिनिटे फलंदाजीचा सराव करताना दिसला, तर जसप्रीत बुमराह यानेही गोलंदाजीचा सराव करताना घाम गाळला.

पहिल्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया चेन्नई येथे दाखल झाली असून आज संपूर्ण संघ एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सराव करताना दिसला. नवे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरही उपस्थित होते.

विराट पहाटे लंडनहून थेट चेन्नई येथे पोहचला. त्यानंतर सराव सत्रात सहभाग घेत विराट जवळपास 45 मिनिटे सराव करत होता. तर बुमराहदेखील सतत गोलंदाजी करताना दिसला. तसेच के. एल. राहुल, ऋषभ पंतदेखील कसून सराव करताना दिसले. हिंदुस्थानचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबतची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. बांगलादेशने नुकताच कसोटी मालिकेत पाकिस्तानचा 2-0 असा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे त्यांचे मनोबल हे उंचावलेले असणार आहे.