>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]
मणिपूर खोऱ्यामध्ये आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट हा लागू केला पाहिजे, ज्यामुळे सैन्याला आपली ऑपरेशन्स सक्षमपणे करता येतील. पुढचे काही दिवस मणिपूरमध्ये सैन्य वाढवून सीमा सुरक्षित केल्या पाहिजेत, ज्यामुळे नवीन शस्त्र, दारूगोळा मणिपूरमध्ये येणार नाही. हिंसाग्रस्त भागांमध्ये शोध मोहीम राबवून लुटलेली सगळी शस्त्र परत मिळवली पाहिजेत. त्याचवेळी स्थानिक पातळीवर कुकी आणि मैतेईंदरम्यान संवाद सुरू करणे अत्यावश्यक आहे.
मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे. मणिपूरमध्ये 10 सप्टेंबरला विद्यार्थ्यांनी राजभवनावर काढलेला मोर्चा हिंसक झाला. पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रुधुराचा मारा केला. यात 40 विद्यार्थी जखमी झाले. पंगपोकी जिह्यात दोन सशस्त्र गटांमधील गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. थंगबू खेडय़ात जमावाने काही घरे जाळल्याने ग्रामस्थांना गावाबाहेर पळ काढावा लागला. तीन जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई संघर्षात ड्रोन, अत्याधुनिक क्षेपणास्त्र वापरून हल्ले करण्यात येत आहेत, असे पोलिसांनी म्हटले आहे. मीडियामध्ये अत्याधुनिक ड्रोन्स आलेल्या बातम्या अतिरंजित आहेत. आकाशात उडणारी काही ड्रोन्स ही टेहळणी करणारी ड्रोन्स होती. आसाम रायफल्सचे निवृत्त महासंचालक जनरल पी.सी.नायर यांनी हल्ल्यात रॉकेट किंवा ड्रोनचा वापर केला जात नसल्याचे म्हटले आहे.
एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यामध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री कुकी समुदायाविषयी अतिशय आक्रमक भाषेमध्ये बोलत होते. त्यामुळे कुकी समुदायाला भीती वाटू लागली. नंतर मणिपूर सरकारने सांगण्याचा प्रयत्न केला की, ही ऑडिओ क्लिप खरी नव्हती. परंतु तोपर्यंत हानी झाली होती, जी भरून काढता आली नाही. आता कुकी समुदायाला फक्त कुकी लँड पाहिजे आणि मैतेयी मुख्यमंत्र्यांचे आणि नेत्यांचे म्हणणे आहे की, दहशतवादीविरोधी अभियान हे पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली आणले पाहिजे, जे अत्यंत धोकादायक होईल. इथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. निवडून आलेल्या दोन खासदारांची आपल्या घराच्या बाहेर पडण्याचीसुद्धा हिंमत नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे, तिथे असलेली अराजकता, हिंसाचार थांबवणे. दहशतवादीविरोधी अभियान फक्त भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखालीच आणायला पाहिजे, जे दोन्ही समुदायांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकू शकते.
आज अनेक सुरक्षा दले मणिपूरमध्ये आहेत, मणिपूर पोलीस आणि मणिपूर रायफल यांनी आपल्याकडे असलेली चार ते पाच हजार रायफल न लढता अराजकीय तत्त्वांना देऊन टाकली, ज्यामुळे हे अतिरेकी एकमेकाला मारत असतात. आपली हत्यारे शत्रूला दिल्याची एकसुद्धा घटना गेल्या पन्नास वर्षांमध्ये भारतीय सैन्यात घडलेली नाही. मणिपूर पोलीस आपल्या जाती-जमातीप्रमाणे आपापल्या अराजकीय तत्त्वांना मदत करताना, त्यांच्याबरोबर हिंसाचार करताना पकडले गेले आहेत. पोलीस नेतृत्व पंट्रोल रूमच्या बाहेर जायला तयार नाही. धोकादायक परिस्थितीमध्ये पोलिसांचे नेतृत्व हवालदार करत आहे. मोठय़ा संख्येने जी अर्धसैनिक दले मणिपूरमध्ये आली आहेत, त्यांचा उपयोग आक्रमक कारवाईकरिता होत नाही. ही अर्धसैनिक दले ‘जगा आणि जगू द्या’ हे तत्त्व वापरतात.
मणिपूरमध्ये झालेल्या सीझ फायर करारामुळे शरणागती पत्करलेल्या अनेक बंडखोर गटांना त्यांच्या शस्त्रांबरोबर पॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. तिथून अनेक शस्त्रs गायब झाली आहेत, ती परत आली पाहिजेत. भारत सरकारने ‘अरामबाई टेंगगोलला’ या मैतेयी उग्रवादी संस्थेच्या हिंसक कारवाया थांबविल्या पाहिजेत, तरच राज्यात शांतता निर्माण होऊ शकते. सध्या कुकी गट हिंसाचार करत आहे आणि मैतेयी स्वतःचे रक्षण करत आहे. कुकी गट मैतेयी गटांवर प्रतिहल्ला करून बदला घेत आहे. कुकी आणि मैतेयी जमातीमध्ये एकमेकांविषयी प्रचंड द्वेष आहे. मणिपुरी युवक स्वभावतः आक्रमक असतात, चांगले सैनिक बनू शकतात, परंतु सध्या त्यांची शक्ती एकमेकांना मारण्यावर खर्च केली जात आहे. हिंसाचारामध्ये महिलासुद्धा सामील आहेत, ज्यांना ‘मीरा पायबी’ म्हटले जाते. या महिला गटांनी आसाम रायफलच्या पंपनी बेसेसना अनेक ठिकाणी वेढा घातला होता, ज्यामुळे आसाम रायफलच्या सैनिकांना आपल्या कॅम्पच्या बाहेर येणे कठीण होते. अनेक वेळा पकडलेल्या दहशतवाद्यांना ‘मीरा पायबी’ गटांनी घेरल्यामुळे भारतीय सैन्याला त्यांना सोडून द्यावे लागत आहे. ‘मीरा पायबी’चे भारतीय सैन्याच्या ऑपरेशनमध्ये अडथळे थांबवलेच पाहिजे, नाहीतर सैन्य काम करू शकणार नाही.
मणिपूरमधील अशा कठीण परिस्थितीवर मात करून भारतीय सैन्य तिथे दिवस-रात्र काम करून अनेकांना वाचवत आहे, मणिपूर खोऱयामध्ये आर्म्ड पर्ह्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट हा लागू केला पाहिजे, ज्यामुळे सैन्याला आपली ऑपरेशन्स सक्षमपणे करता येतील.
मणिपूरचे पोलीस नेतृत्व आपल्या कामांमध्ये पूर्णपणे अयशस्वी झालेले आहे. त्या जागी निधड्या छातीच्या सैनिकी नेतृत्वाची गरज आहे की, जे सैनिकांबरोबर धोकादायक परिस्थितीमध्ये जाऊन आपल्या सैनिकांचं नेतृत्व करतील आणि परिस्थितीला सामान्य करतील. मणिपूर जनतेचा फक्त भारतीय सैन्यावरच विश्वास आहे आणि प्रत्येक वस्ती आमच्या जवळ सैन्याला तैनात करावे असे म्हणत आहे. सैन्याच्या दिमापूरस्थित तीन कोरच्या नेतृत्वाखाली सगळ्या सुरक्षा दलांना आणले जावे आणि सुरक्षा दलांचा वापर कसा केला पाहिजे हे तीन कोरने ठरवावे.
पुढचे काही दिवस मणिपूरमध्ये सैन्य वाढवून सीमा सुरक्षित केल्या पाहिजेत, ज्यामुळे नवीन शस्त्र, दारूगोळा मणिपूरमध्ये येणार नाही. हिंसाग्रस्त भागांमध्ये शोध मोहीम राबवून लुटलेली सगळी शस्त्र परत मिळवली पाहिजेत. कुठल्याही शस्त्रधारी गटांच्या बरोबर संवाद होऊ शकत नाही. मात्र त्याचवेळी स्थानिक पातळीवर कुकी आणि मैतेईंदरम्यान संवाद सुरू करणे अत्यावश्यक आहे. चर्चेची द्वारे खुली केल्याशिवाय हा वांशिक संघर्ष आटोक्यात येणार नाही.