
लालबागमध्ये गुरुवारी रात्री खटाव बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. डीजे सिस्टिम बंद करण्यावरून वाद निर्माण झाला. एका पोलिसाने डिजे ऑपरेट करणाऱ्या तरुणाला मारहाण केली. त्याचे सामानही उचलून घेऊन गेले. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि मिरवणूक पुढे नेणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी एका नागरिकाने सांगितले की, आम्ही पोलिसांना सहकार्य करत होतो. त्यांनी सांगितल्यावर लगेच डिजे बंद केला. पण तरीही दोन पोलीस ट्रकमध्ये चढले आणि त्यांनी लाथ मारून स्पीकर खाली पाडला. तर दुसऱ्या पोलिसाने डीजे ऑपरेटरला मारहाण केली. यावरून नागरिक संतापले. मारहाण करणारे पोलीस माफी मागत नाहीत तसेच घेऊन गेलेल्या वस्तू परत आणून देत नाहीत, तो पर्यंत जागेवरून हलायचं नाही, अशी भूमिका घेत तिथेच ठिय्या मांडला.
या प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ”मी पोलिसांना बोललो, इतकं ताणून धरण्याची गरज नव्हती. घड्याळाच्या काट्यावर दहा मिनिटं, एक मिनटं असं बघण्याची गरज नव्हती. ठिक आहे तुम्ही आता अॅक्शन करून झालेले आहात तुम्ही त्यांची जी वस्तू घेऊन गेलायत, ती परत आणून द्या.. आम्ही तुमच्यासोबत येऊ. वातावरण का बिघडवताय? रहिवाशांनी आम्हाला सांगितले आम्ही तिकडे येणार नाही आमची वस्तू घेऊन इकडे या. तुम्ही ते करायला हवे तुम्ही ऐकत नसाल तर आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे ते म्हणाले.