अंबरनाथमध्ये केमिकल फॅक्टरीतून वायू गळती, नागरीकांच्या डोळ्यांना आणि घशाला त्रास

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये एका केमिकल कंपनीच्या फॅक्टरीमधून वायू गळती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण  आहे. केमिकलचा धूर संपूर्ण शहरात पसरल्याने शहरात धुक्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. हवेत वायू पसरल्याने घसा खवखवणे आणि डोळ्यात जळजळ होण्याच्या तक्रारी नागरीकांमधून येऊ लागल्या. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये रस्ते धुराने भरलेले दिसत आहेत. जे लोक संपर्कात आली आहेत त्यांनी नाक-तोंड झाकले आहे. संपूर्ण परिसर धुराने व्यापलेला दिसत आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, हा वायू रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत लोक शहर सोडून जाण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. गळतीचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पथकेही पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

मोरिवली एमआयडीसी परिसरात 12 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उग्र वास येऊ लागला. त्यामुळे अनेक नागरीकांना त्याचा त्रास होऊ लागला. दरम्यान, अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता एमआयडीसीतील एकाही कंपनीतून वायू सोडण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, शहरात धुराचे लोट पसरल्याने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, निक्केम केमिकल कंपनीचे रसायन हवेत पसरल्याने नागरीकांना आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागले. अनेकांना घसादुखी आणि डोळ्यांची जळजळ होऊ लागली. सध्या वायू प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मोबाईल व्हॅनद्वारे वायू प्रदूषणावर लक्ष ठेवले जात आहे. नेमका वायू कोणता? याचा तपास सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात असून घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.