
धाटाव एमआयडीसीमधील साधना नायट्रोकेम या कंपनीत असलेल्या केमिकल टँकचा आज सकाळी सवाअकराच्या सुमारास भीषण स्फोट झाला. सीएफ दोन प्लाण्टमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना स्पार्क होऊन मिथेनॉल या घातक रसायनाने पेट घेतला आणि आग लागली. स्फोट व आगीमुळे तीन कामगार जागीच ठार झाले असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की एक किलोमीटरचा परिसर हादरून गेला. आज गणपती विसर्जनामुळे कंपनीत कामगारांची तुरळक हजेरी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान या स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसीतील प्रोबेस व अमुदान कंपनीतील स्फोटांच्या आठवणी ताज्या झाल्या. आजच्या घटनेमुळे धाटाव एमआयडीसीमधील हजारो कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वेळीच बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला
साधना नायट्रोकेम या कंपनीत स्फोट झाल्याचे वृत्त समजताच आजूबाजूच्या कारखान्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. पोलीस उपअधीक्षक शैलेश कोळी, नायब तहसीलदार राजेश थोरे, पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. स्फोट झाला तेव्हा कंपनीतील कामगार वेळीच बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला.
रोह्याच्या धाटाव एमआयडीसीमधील प्लॉट क्रमांक 47 येथे साधना नायट्रोकेम लिमिटेड ही कंपनी गेल्या 50 वर्षांपासून केमिकलचे उत्पादन करते. कंपनीमध्ये सुमारे 200 कामगार काम करीत असून तीन शिफ्टमध्ये उत्पादन चालते. सकाळी सातची शिफ्ट सुरू होती तेव्हा अंदाजे 80 कामगार काम करीत होते. सकाळी सवाअकरा वाजता केमिकल प्लाण्टमध्ये एम. के. फॅब्रिकेटर्स या ठेकेदार एजन्सीचे सहा कामगार वेल्डिंगचे काम करीत असताना अचानकपणे मिथेनॉलने पेट घेतला. त्यामुळे केमिकल टँकचा मोठा स्फोट झाला. कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने संपूर्ण घाटाव गाव भयभीत झाले. अनेक ग्रामस्थांना तर नेमके काय झाले हे समजेना. या दुर्घटनेत संजीत कुमार, दिनेश कुमार व बास्की यादव हे तिघे जण ठार झाले. तर नीलेश भगत, अनिल मिश्रा, सतेंद्र कुमार हे तिघे जखमी झाले आहेत. अन्य जखमींवर रोह्यातील भट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
साधना नायट्रोकेम कंपनीचे मॅनेजर पवार हे 15 दिवसांच्या रजेवर आहेत. असे असतानाही वेल्डिंगचे काम करण्यासाठी ठेकेदार एजन्सीला वर्क परमीट कसे काय मिळाले, असा सवाल कामगारांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रोडक्शन मॅनेजरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. दरम्यान, अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.