हिंडनबर्गनं आणखी एक बॉम्ब टाकला; अदानींशी संबंधित स्विस बँकेतील 2600 कोटी गोठवल्याचा दावा

गतवर्षी अदानी समूहातील गैरव्यवहाराचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून देणाऱ्या ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने गुरुवारी नवा बॉम्ब टाकला. अदानी समूहाशी संबंधित स्विस बँकेतील 310 दशलक्ष डॉलर (जवळपास 2600 कोटी रुपये) एवढी प्रचंड रक्कम गोठवण्यात आल्याचा दावा या अमेरिकन कंपनीने केला आहे. 2021 पासून सुरू असलेल्या मनी लॉण्ड्रिंग आणि फसवणुकीच्या तपासाचा एक भाग म्हणून स्वीस अधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. हिंडनबर्गच्या या नव्या धमाक्यामुळे खळबळ उडाली असून शुक्रवारी शेअर बाजारातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

हिंडनबर्गचा नवा गौप्यस्फोट काय?

अमेरिकन कंपनी हिंडबर्गने रिसर्चने गुरुवारी उशिरा एक ट्विट आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून केले. यात त्यांनी म्हटले की, 2021 पासून अदानी समूहावर सुरू असलेल्या मनी लॉण्डरिंग आणि सिक्युरिटीजच्या खोट्या तपासाचा भाग म्हणून स्विस अधिकाऱ्यांनी अनेक स्विस बँक खात्यांमधील 310 दशलक्ष डॉलर (जवळपास 2600 कोटी रुपये) एवढी रक्कम गोठवण्यात आले आहेत.

या पोस्टमधअये हिंडनबर्गने ‘गोथम सिटी’ या स्विस मिडिया आऊटलेटचा हवाला दिला आहे. यात नव्याने प्रसिद्ध झालेल्या स्विस फौजदारी न्यायालयाच्या नोंदीनुसार सरकारी वकिलांनी अदानींच्यावतीने एका व्यक्तीने अपारदर्शक पद्धतीने मॉरिशस आणि बर्म्युडा फंडामध्ये कशी गुंतवणूक केली याची तपशीलवार माहिती दिली आहे.

सेबीवर आरोप

तत्पूर्वी हिंडनबर्गने गेल्या महिन्यात थेट सेबीवर आरोप केले होते. सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बूच व त्यांच्या पतीची अदानी समूहाच्या कंपनीत भागीदारी आहे. त्यामुळेच सेबीने शेअर्स किमतीतील हेराफेरी, मनी लॉण्डरिंग आदी गंभीर आरोपांनंतरही अदानी समूहावर 18 महिन्यांत कोणतीच कारवाई केली नाही, असा गौप्यस्फोट ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने केला होता. हा वाद शमत नाही तोच हिंडनबर्गने आणखी एक धमाका केला आहे.