देशभरातील महत्वाच्या घडामोडी

जम्मू-कश्मीरमध्ये निवडणुकीच्या 6 दिवस आधी स्फोटके जप्त

जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा घातपात घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. निवडणुकीला 6 दिवस शिल्लक असताना कुपवाडा जिह्यात लष्कराने मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि स्फोटके जप्त केली आहेत. यात एके 47 ची 100 हून अधिक काडतुसे, 20 हातबॉम्ब आणि 10 लहान रॉकेट सापडले आहेत. आयईडी स्फोटकांशी संबंधित साहित्यही जप्त करण्यात आले आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनंतर कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये लष्कर आणि जम्मू- कश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. जम्मू-कश्मीरमध्ये तैनात असलेल्या विशेष निवडणूक निरीक्षकाकडून लष्कराला याबाबतची माहिती मिळाली होती.

विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा अटकेत

लोकल प्रवासात विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी अटक केली. इब्राहिम मुश्ताक शेख असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. पीडित मुलगी ही पूर्व उपनगरात राहत असून ती भायखळा येथे एका महाविद्यालयात शिकते. बुधवारी सकाळी ती तिच्या वडिलांसोबत लोकलने भायखळा येथे गेली होती. तर इब्राहिम हा दादर येथून लोकलने भायखळा येथे येत होता. लोकल भायखळा स्थानकात आल्यावर इब्राहिमने मुलीला अश्लील स्पर्श करून तिच्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर दिला. हा प्रकार तिच्या वडिलांच्या लक्षात आला. तिच्या वडिलांनी इतर प्रवाशांच्या मदतीने इब्राहिमला पकडले व गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या स्वाधीन केले. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी शेखला अटक केली.

चेंबूरमध्ये मुलीची गळफास लावून आत्महत्या

घरात कोणी नसताना 14 वर्षीय मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चेंबूर येथे घडली. ती मुलगी गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होती. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. ती मुलगी दोन मोठ्या बहिणी आणि आजी-आजोबांसोबत राहत होती. आईच्या मृत्यूनंतर गेल्या सहा महिन्यांपासून मुलगी नैराश्येच्या गर्तेत सापडली होती. तिच्यावर शीव इस्पितळात उपचार सुरू होते. घटना घडली तेव्हा मुलीच्या बहिणी कामावर गेल्या होत्या, तर आजी-आजोबा काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरात कोणी नसल्याचे हेरून मुलीने ओढणीने गळफास घेत स्वतःचे आयुष्य संपवले. याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

वीज कर्मचाऱ्यांची दोन दिवस संपाची हाक

16 जलविद्युत निर्मिती केंद्रांचे खासगीकरण नको, केंद्र सरकारच्या धर्तीवर वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी, महापारेषण कंपनीतील 200 कोटींच्या वरील प्रकल्प खासगी भांडवलदारांना देण्यास विरोध आणि स्मार्ट प्रीपेड मीटरचा प्रकल्प सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावा या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने 25 व 26 सप्टेंबर रोजी संप करणार आहेत. या संपानंतरही सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर मात्र बेमुदत संपावर जाऊ, असा इशारादेखील कृती समितीने दिला आहे.

लष्करी अधिकाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी तीन गुंडांना अटक

महू येथील दोन लष्करी अधिकाऱ्यांना मारहाण करून त्यांच्या एका मैत्रिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुरुवारी या परिसरातून तीन गुंडांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. जंगलांनी वेढलेल्या डोंगराळ प्रदेशातील जाम गेट भागात बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेशी संबंधित सहा आरोपींची ओळख पटली आहे, असे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हितिका वासल यांनी सांगितले. हे आरोपी स्थानिक असून त्यातील दोघांवर आधीही गुन्हे दाखल आहेत. या चौघांना ताब्यात घेऊन त्यांनी दहा लाखांची मागणी केली होती. दोन महिलांपैकी एकीला त्यांनी बाजूलाही नेले होते. तिचा जबाब घेणे बाकी असल्याचे वासल यांनी सांगितले.

वसीम अहमद खान यांचे गायन

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने 22 सप्टेंबर रोजी वसीम अहमद खान यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांना तबल्यावर अभय दातार तर संवादिनीवर निरंजन लेले साथसंगत करतील. वसीम खान हे 13 व्या शतकापासून हिंदुस्थानी गायन क्षेत्रातील आग्रा घराण्याचे एकमेव थेट वंशज आहेत. त्यांच्या गायकीत आग्रा धृपद गायनाचा प्रभाव आहे. नाना आणि भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि भरत व शैलेश राजाध्यक्ष तसेच शारदा सबनीस यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होईल. कार्यक्रम रविवारी सायंकाळी 5 वाजता संस्थेच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात असून सर्वांसाठी खुला आहे.

पितृपक्षात अन्नदान उपक्रम

परळ येथील ‘स्वामी’ या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी पितृपक्षात कॅन्सरग्रस्त रुग्ण व गोरगरीबांना अन्नदान केले जाते. या वर्षी येत्या 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात गरजूंना आणि बाहेरगावाहून मुंबईत येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना धान्य वाटप केले जाईल. प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या तिथीनुसार स्वहस्ते अन्नदान करण्यासाठी 8928061391 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘स्वामी’ संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.