पहाटेच्या सुमारास नामांकित दुधात भेसळ करून आरोग्यास हानीकारक ठरणारे ते दूध नागरिकांना विकणाऱ्या दोघांचा कारभार एफडीएच्या पथकाने उधळून लावला. पथकाने मालाडच्या कुरार परिसरात छापेमारी करून दोघांना दुधात भेसळ करताना रंगेहाथ पकडले. तसेच मोठ्या प्रमाणात भेसळ केलेल्या दुधाची विल्हेवाट लावली.
मालाड पूर्वेकडील कुरार परिसरातल्या इंदिरा नगरात राहणारे सैदुल दडपेली (38) आणि श्रीनिवासुलू बंडारू (52) हे दोघे दूध विक्रीचे काम करतात. मात्र पहाटे येणाऱ्या नामांकित दुधाच्या पिशव्यांमध्ये अस्वच्छ पाण्याची भेसळ करीत असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार सहआयुक्त (अन्न) एम. एन. चौधरी, सहाय्यक आयुक्त डी. एस. महाले यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने त्या ठिकाणी पहाटेच्या वेळेस छापा टाकला.
छाप्यात दडपेली आणि बंडारू हे गोकुळ, महानंद आणि अमूल या नामांकित कंपनीच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये भेसळ केलेले दूध भरत असताना रंगेहाथ सापडले. त्यांनी भेसळ केलेले हजारो रुपयांचे दूध नष्ट करण्यात आले. तसेच दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट-12 च्या मदतीने एफडीएने ही कारवाई केली.