… तरच शरद पवार घेणार झेड प्लस सुरक्षा, मोदी सरकारला घातल्या अटी

केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही सुरक्षा घेण्यापूर्वी शरद पवार यांनी केंद्र सरकार पुढे काही अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत. त्या मान्य केल्या तरच सुरक्षा घेण्याचा विचार करू असे पवार यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून कळवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

गृह मंत्रालयाने शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. सीआरपीएफचे 58 कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार होते. मात्र, आपणाला अतिरिक्त सुरक्षेची गरज नसल्याचं पवार यांनी त्यावेळी देखील सांगितले होते. शरद पवारांनी केंद्र सरकार आपणाला ही सुरक्षा का देत आहेत? मला कोणत्या प्रकारचा धोका आहे? याची चौकशी करू आणि त्यानंतरच सुरक्षा घेण्याचा विचार करू, असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार केंद्राची सुरक्षा घेण्याआधी पवार यांनी केंद्रापुढे काही अटी ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. शरद पवारांनी केंद्राच्या सुरक्षेआधी जे राज्याचे सुरक्षा कर्मचारी त्यांच्यासोबत आहेत ते तसेच रहावेत अशी मागणी केली आहे. तसेच कार्यालयात आणि निवासस्थानामध्ये केंद्राच्या सुरक्षा रक्षकांना प्रवेश नसावा, प्रवासादरम्यान खाजगी गाडीमध्ये सुरक्षा कर्मचारी नसावेत, अशा अटी पवारांनी ठेवल्या आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी केंद्र सरकारला पाठवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

या सर्व अटींवरती सकारात्मक निर्णय झाला तरच आपण केंद्राची झेड प्लस सुरक्षा घेण्याबाबत सकारात्मक विचार करू असंही या पत्रातून नमूद केले आहे. या संदर्भात सुरक्षा अधिकाऱ्यांसमवेत शरद पवार त्यांच्या प्रतिनिधींची दिल्ली येथे बैठकीत सुरक्षितेबाबत चर्चा करण्यात आली आल्याची माहिती आहे.