पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करत असताना बंगळुरूमध्ये एक वेगळी घटना घडली. गणपती बाप्पाचे विसर्जन करताना तब्बल चार लाख रुपयांच्या सहा तोळय़ांच्या सोन्याच्या साखळीसह गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर साखळी शोधण्यासाठी कुटुंबाने प्रशासनाच्या मदतीने दहा हजार लिटर पाणी बाहेर काढले. दहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सोनसाखळी मिळाली आणि कुटुंबाने निःश्वास सोडला.
गणपतीच्या सजावटीसाठी बंगळुरूच्या गोविंदराजनगर येथील कुटुंबाने तब्बल चार लाख रुपयांची 60 ग्रॅम सोन्याची साखळी आणली होती. गणपतीचे विसर्जन करत असताना कुटुंबीय ती साखळी काढण्यास विसरले आणि त्यांनी गणेशमूर्तीचे विसर्जन केले. गणपती विसर्जनानंतर साखळी काढण्यास विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांना धक्का बसला. गणपतीचे विसर्जन केले त्या ठिकाणी साखळीचा शोध घेण्यासाठी ते कुटुंबीय पोहोचले, मात्र संबंधित ठेकेदाराने पाणी उपसण्यास नकार दिला. त्यानंतर त्या कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली. यानंतर प्रशासनाच्या मदतीने साखळीचा शोध घेण्यास सुरुवात झाली. तब्बल दहा तास हे कुटुंबीय साखळीचा शोध घेत होते. या साखळीच्या शोधासाठी दहा हजार लिटर पाणी बाहेर काढण्यात आले. ठेकेदाराने अनेकांना साखळी शोधण्यासाठी कामाला लावले. अखेर साखळी सापडली.