मणिपूरच्या जिरीबाममध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पेटवले, मैतेईंच्या गावांवर गोळीबार, बॉम्बहल्ले केल्याचा आरोप

वांशिक हिंसाचाराने होरपळणाऱया मणिपूरमधील जिरीबाममध्ये काही अज्ञात लोकांनी आज पहाटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पेटवून दिले. पोलीस चौकीपासून अवघ्या दोनशे मीटरवर हे केंद्र होते.
बोरोबेक्रा भागात ही घटना पहाटे घडली. जाळपोळीच्या वेळी पेंद्रात कुणीही नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही, असे सांगण्यात आले. जिरीबाममध्ये 7 सप्टेंबर रोजी उसळलेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला होता.

मैतेईंच्या गावांवर हल्ल्यांचा दावा

जिरीबाममधील बोरोबेक्रा उपविभागातील निंगथेम खुनौ, मोंगबुंग आणि इतर काही गावांना लक्ष्य करत बुधवारी संध्याकाळी सातनंतर कुकी अतिरेक्यांनी गोळीबार आणि शक्तिशाली बॉम्बने जोरदार हल्ले केले, असा आरोप कुकाRच्या गटाने केला आहे. जिरीबाममध्ये जूनपासून हिंसक घटना वाढल्या असून दोन्ही बाजूंनी जाळपोळीच्या घटनांमुळे हजारो लोकांनी आपली घरे सोडून मदत छावण्यांमध्ये स्थलांतर केले आहे.

मणिपूरमधील ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुन्हा सुरू

राज्यातील कायदा-सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेतल्यावर आज राज्य सरकारने 5 जिह्यांमधील ब्रॉडबँड इंटरनेट सेवेवरील बंदी उठवली. मोबाईल इंटरनेट सेवा मात्र तूर्त बंदच राहणार आहे. इंफाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, बिश्नपूर, थौबल आणि कक्चिंग या पाच जिह्यांतील ब्रॉडबँड इंटरनेटवरील सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे, असे अधिकाऱयांनी सांगितले.