मनू तीन महिने पिस्टलपासून दूर, विश्रांतीमुळे विश्वचषक नेमबाजीत खेळणार नाही

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकांवर नाव कोरणारी हिंदुस्थानची युवा नेमबाज मनू भाकरला तीन महिने आपल्या पिस्टलपासून दूर राहणार आहे. तिला विश्रांती देण्यात आल्यामुळे आगामी आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आलेली नाही. आता तिच्या जागी रिदम संगवान ही मोसमाअखेरीस होणाऱ्या या शेवटच्या स्पर्धेत दोन प्रकारात सहभागी होणार आहे.

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (एनआरएआय) गुरुवारी हिंदुस्थानच्या 23 जणांच्या संघाची घोषणा केली. नवी दिल्लीतील कर्णी सिंग शूटिंग रेंजवर ही स्पर्धा रंगणार असून रायफल, पिस्टल आणि शॉटगन प्रकारात खेळवली जाणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या नऊ सदस्यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. हिंदुस्थानचे एकूण 11 ऑलिम्पियन वर्षअखेरीस सर्वोत्तम नेमबाजाचा पुरस्कार पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

22 वर्षीय मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात सरबज्योत सिंगच्या साथीने कांस्यपदक पटकावत इतिहास घडवला होता. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके पटकावणारी ती देशाची पहिली खेळाडू ठरली आहे.

दिव्यांश सिंग पनवार (पुरुष 10 मीटर एअर रायफल), सोनम मसकर (महिला 10 मीटर एअर रायफल), रिदम संगवान (महिला 10 मीटर एअर पिस्टल आणि 25 मीटर पिस्टल) आणि गनेमत सेखोन (महिला स्किट) या चार नेमबाजांची थेट निवड एनआरएआयने केली आहे. त्यानंतर अन्य नेमबाजांना ऑलिम्पिक निवड चाचणीतील क्रमवारीनुसार निवडण्यात आले आहे. 20 वर्षीय रिदम संगवान हिला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुरभी राव हिची साथ लाभणार आहे. ऑलिम्पियन मायराज अहमद खान (पुरुष स्किट) आणि चेन सिंग (पुरुष 50 मीटर रायफल थ्री पोझिशन) हे हिंदुस्थानी संघात परतले आहेत.

हिंदुस्थानी संघ

एअर रायफल ः दिव्यांश सिंग पनवार, अर्जुन बबुटा, सोनम उत्तम मसकर, तिलोत्तमा सेन.
50 मीटर रायफल थ्री पोझिशन ः चेन सिंग, अखिल शेरॉन, अंशी चौकसी, निश्चल.
एअर पिस्टल ः अर्जुन सिंग चिमा, वरुण तोमर, रिदम संगवान, सुरक्षी राव.
25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल ः अनिश भानवाला, विजयवीर सिधू, रिदम संगवान, सिमरनप्रीत कौर ब्रार.
ट्रप ः विवान कपूर, भौनिश मेंडिरत्ता, राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग.
स्किट ः अनंतजीत सिंग नारूका, मायराज अहमद खान, गनेमत सेखोन, माहेश्वरी चौहान.