मुंबई इंडियन्ससोबतचा रोहितचा प्रवास संपलाय, समालोचक आकाश चोप्रा यांचा अंदाज

आयपीएलच्या मेगा लिलावाची तारीख जवळ आलीय आणि सर्वत्र एकच चर्चा आहे, रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्ये राहणार की जाणार? प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांच्यानुसार रोहित मुंबई इंडियन्स सोडणार किंवा मुंबई इंडियन्स त्याला सोडू शकते. दोघांपैकी एक गोष्ट नक्की होईल, असे भाकीत त्यांनी वर्तवलेय.

2024 च्या आयपीएल मोसमापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदापासून दूर करत हार्दिक पंड्याकडे सूत्रे दिली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हा दुरावा 2025 च्या मेगा लिलावात दिसेल. ‘हिटमॅन’ रोहित नव्या फ्रेंचायझीजच्या शोधात असून त्याला ट्रेड विंडोद्वारे नव्या फ्रेंचायझीमध्ये स्थानांतरित केले जाऊ शकते, असेही चोप्रा म्हणाले.

गेल्या आयपीएलचा अनुभव पाहाता रोहित मुंबई इंडियन्सपासून दूर जाईल. जो संघ त्याला घेईल तो पुढील तीन वर्षांचे गणित डोक्यात घेऊनच त्याला मैदानात उतरवेल. मात्र क्रिकेटसारखी अनिश्चितता आयपीएलच्या लिलावातही आहे. रोहितबाबतीत काहीही घडू शकते.

रोहितला ट्रेड विंडोतून दुसऱ्या संघात पाठवण्याची शक्यता अधिक आहे. पण असे न घडल्यास त्याचाही लिलाव केला जाऊ शकतो. पण मुंबई इंडियन्ससोबत त्याचा प्रवास संपलाय. या घटनाक्रमात मुंबईचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडून काढून घेतले जाईल आणि सूर्यकुमारच्या हातात नेतृत्व दिले जाईल. सध्यातरी सूर्या कुठेही जाणार नसल्याचेही चोप्रा म्हणाले.