…तर विराट कोहली जगातला पहिला फलंदाज ठरणार

येत्या आठवड्यात बांगलादेशविरुद्ध हिंदुस्थान पहिला कसोटी सामना खेळणार आहे आणि त्या सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून 58 धावा निघाल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 पेक्षा कमी डावांत 27 हजार धावा करणारा तो क्रिकेट विश्वातला पहिला फलंदाज ठरेल. विराटने आतापर्यंत 591 डावांत 26,942 धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या (34,357) नावावर असून त्याच्यापाठोपाठ कुमार संगक्कारा (28,016) आणि रिकी पॉण्टिंग (27,483) हे दोघे आहेत. या तिघांनीही 27 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 600 पेक्षा अधिक सामने घेतले आहेत. त्यात सर्वात वेगवान हा टप्पा सचिनने गाठला असून त्याने 623 डावांत हे साकारले होते.

कोहलीने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीतच ही मजल मारतो तर हा विश्वविक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाईल. तसेच विराट हा सचिनच्या 100 शतकांच्या विश्वविक्रमाचाही पाठलाग करतोय. त्याने आतापर्यंत 80 शतके ठोकली आहेत. शतकांच्या बाबतीत सचिननंतर विराटच आहे.