महाराष्ट्रात येणारे उद्योग मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे परराज्यात गेले, आता राज्यात वर्षानुवर्षे असलेल्या आणि हजारो तरुणांना रोजगार देणाऱया उद्योगांनाही विनाकारण त्रास देऊन ते पळवून लावू नका, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मिंधे सरकारला बजावले.
आदित्य ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मर्सिडीज बेंझवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) टाकलेली धाड आणि इतर विषयांबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मर्सिडीज बेंझ कंपनीकडून पर्यावरणाला हानीकारक काम केले जातेय असा दावा करत एमपीसीबीच्या अध्यक्षांनी नुकतीच मर्सिडीज बेंझ कंपनीवर धाड घातली होती. त्याबद्दल त्यांनी वक्तव्यही केले होते आणि ट्विटदेखील केले होते. परंतु काही वेळानंतर ते वक्तव्यही मागे घेतले आणि ट्विटही डिलिट करून टाकले. जे उद्योग महाराष्ट्रात वर्षानुवर्षे आहेत; ज्यांच्यामुळे हजारो-लाखो तरुणांना रोजगार मिळाले आहेत, त्या उद्योगांना त्रास देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय साध्य करू इच्छित आहे, असा संतप्त सवालही त्यांनी केला.
मर्सिडीजवर धाड घातलीत, मग दंड किती केलात?
एमपीसीबीला आपण यासंदर्भात पत्र लिहिले आहे. मर्सिडीज बेंझने पर्यावरणाचा नेमका कसा ऱहास केला आहे? त्यांनी नेमके काय केले आहे? कंपनीला नेमका किती दंड आकारण्यात आला आहे? एमपीसीबीच्या अध्यक्षांनी कंपनीला निव्वळ भेट दिली होती की ती धाड होती? असा सवाल आपण त्या पत्रात केला होता. परंतु अद्याप एमपीसीबीने त्याचे उत्तर दिलेले नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मर्सिडीज ही जर्मन कंपनी आहे आणि तिच्यावर धाड पडत असेल तर त्याचा परिणाम जर्मनीबरोबरच्या आपल्या राजनैतिक संबंधांवरही पडू शकतो याचे भान ठेवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
केंद्राने महाराष्ट्राच्या डोळय़ात धूळफेक केली
केंद्र सरकारवरही आदित्य ठाकरे यांनी यावेळी टीका केली. महाराष्ट्रात ग्लोबल इकॉनॉमिक हब बनवायचे असेल तर इतका वेळ का लागतोय? केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या डोळय़ात धूळफेक केली, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईला आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र द्या, असे ते पुढे म्हणाले. गिफ्ट सिटी केंद्र सरकारने महाराष्ट्राबाहेर गुजरातला नेली, बीकेसीतील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी गिफ्ट सिटीचे उदो उदो केले, पण त्यांनी मुंबईचे नाव घेतले नाही त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.