कानपूर महामार्गावर शीर नसलेला महिलेचा निर्वस्त्र मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिल्ली-वाराणसी राष्ट्रीय महामार्गावर 40 वर्षीय शीर नसलेला अर्धनग्न मृतदेह आढळून आला. दरम्यान, डीसीपी रवींद्र कुमार यांनी पीडितेचा अपघातात मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महिलेचे दात आणि हाडांचे तुकडे ताब्यात घेतले. फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल.
मृतदेह आढळून आला तेथे सीसीटीव्ही कॅमेरा नाही. मात्र पोलिसांनी आसपासच्या परिसरातील 104 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. यापैकी तीन व्हिडिओमध्ये एक महिला एकटी सर्विस लेन आणि महामार्गावर चालताना कैद झाली आहे. ज्या महिलेचा मृतदेह सापडला ती सीसीटीव्हीत दिसणारी महिलाच आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
सपा प्रमुख अखिलेश यांची प्रतिक्रिया
दरम्यान सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याप्रकरणी निःष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे. कानपूर महामार्गावर महिलेचा शीर नसलेला विवस्त्र मृतदेह आढळणे ही उत्तर प्रदेशातील महिलांवरील अत्याचाराची आणखी एक हृदयद्रावक घटना आहे. महिलेचा छळ आणि बलात्कारानंतर हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या दिशेने नि:पक्षपातीपणे तपास व्हायला हवा. दोषींचा शोध घेऊन पीडितेला न्याय मिळवून द्यावा. महिलांवरील अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी गुन्हे करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण केली पाहिजे. भाजप सरकार राजकारण बाजूला ठेवून याची चौकशी करेल अशी आशा आहे.