मी राजीनामा देण्यास तयार; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालच्या जनतेची मागितली माफी

कोलकातामधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावर डॉक्टरांचा संप आणि आंदोलन सुरूच आहे. आंदोलन मागे घेऊन डॉक्टरांनी कामावर परतावं, असं आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. पण दोन तास वाट बघूनही आंदोलक डॉक्टर चर्चेसाठी आले नाहीत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रिकाम्या खुर्च्यांसमोर एकट्याच वाट बघत बसून होत्या. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या प्रकरणी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली.

आंदोलन मागे घेऊन कामवर रुजू व्हावं, असं आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना केलं होतं. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव मनोज मंत यांनी आंदोलन करणाऱ्या ज्युनिअर डॉक्टरांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2 तास 10 मिनिटं वाट बघितली, पण चर्चेसाठी कोणीही आलं नाही. अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगालच्या जनतेची माफी मागितली. तसेच आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना कामावर परण्याचं आवाहन केलं.

आंदोलकांना न्याय नकोय, त्यांना माझी खुर्ची हवी आहे. मी जनतेसाठी राजीनामा देण्यास तयार आहे. मला मुख्यमंत्रीपद नको. दोषींविरोधात खटला चालावा आणि सामान्यांना न्याय मिळावा, अशी माझी अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.