‘मुलगी अनोळखी मुलासोबत पहिल्या भेटीत….’; हायकोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण, बलात्काराच्या आरोपातून तरुण निर्दोष

बलात्काराच्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. ‘कुठलीही मुलगी पहिल्या भेटीत अनोळखी मुलासोबत हॉटेलच्या रूममध्ये जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आणि बलात्काराच्या प्रकरणात तक्रारदार तरुणीच्या जबाबावर शंका घेतली. याचवेळी सबळ पुराव्याअभावी आरोपी तरुणाची निर्दोष मुक्तता केली. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, ती फेसबुकच्या माध्यमातून आरोपीच्या संपर्कात आली होती. नंतर फोनवर एकमेकांशी चॅटिंग आणि बोलणे सुरु राहिले होते. याचदरम्यान फेब्रुवारी 2017 मध्ये तिला भेटण्यासाठी आरोपी दुसऱ्या जिल्ह्यातून तरुणीच्या कॉलेजमध्ये आला होता. त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात आरोपीने त्याच्या घराजवळील हॉटेलच्या रूममध्ये भेटायला बोलावले होते. काही महत्वाचे बोलायचे असल्याचे सांगून त्याने रूम बुक केला होता. तेथे सहमतीने शरीरसंबंध ठेवले. याचदरम्यान आरोपीने काही आक्षेपार्ह फोटो काढले व ते फेसबुकवर शेअर करण्यासह नातेवाईकांना पाठवले, असा आरोप पीडित तरुणीने केला.

पीडित तरुणीने केलेले आरोप तसेच तिचा जबाब ग्राह्य धरण्यास न्यायमूर्ती सानप यांनी स्पष्ट नकार दिला. कुठलीही तरुणी कुणा अनोळखी व्यक्तिसोबत सुनसान ठिकाणी जाते व तिथे ती अडचणीत सापडते, त्यावेळी तरुणी मदतीसाठी आरडाओरड करून धावा करेल. कथित प्रकार घडला, ती हॉटेलची रूम वर्दळीच्या परिसरापासून दूर नव्हती. पीडित तरुणीचे कथित प्रकारानंतरच्या हालचाली तिने केलेल्या आरोपांशी सुसंगत नाहीत, असे मत न्यायालयाने आदेशपत्रात व्यक्त केले आहे.

आरोपीला सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्या निकालाला आव्हान देत आरोपीने दाखल केलेल्या अपिलावर नागपूर खंडपीठाने निकाल दिला आणि आरोपी तरुणाची निर्दोष मुक्तता करीत त्याला मोठा दिलासा दिला.