एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या नाशिकच्या अभिषेक युवराज जाधव (21) याचा रशियात मंगळवारी पहाटे कार व ट्रकच्या अपघातात मृत्यू झाला. यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. जेलरोड येथील युवराज जनार्दन जाधव हे महापालिकेच्या सिडको
विभागीय कार्यालयात कर्मचारी आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक हा रशियात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर सोमवारी तो नाशिकमधील इतर पाच विद्यार्थ्यांसोबत रशियाला पुन्हा गेला. तेथे मंगळवारी पहाटे विमानतळावर उतरल्यानंतर टॅक्सीने वसतिगृहाकडे जात होता. त्यांची टॅक्सी एका ट्रकवर धडकली, यात अभिषेकचा मृत्यू झाला, त्याचे नाशिकचे अन्य मित्र जखमी आहेत. अभिषेकच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे पार्थिव गुरुवारी सायंकाळपर्यंत नाशिकला आणण्यात येईल.