कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांच्या दालनात कपडे काढले; मिंधे गटाच्या माजी नगरसेवकावर गुन्हा

मिंधे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात येऊन फडके चौक प्रभागातील पाणीप्रश्नावरून आयुक्तांच्या दालनासमोर कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत उपोषण सुरू केले. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी उगले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून फडके चौक परिसरातील प्रभागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. हा भाग मोहन उगले यांच्या प्रभागात येतो. पालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही ते त्याची दखल घेत नव्हते. त्यामुळे मोहन उगले पालिका मुख्यालयात आले. त्यांनी आयुक्तांच्या दालनात प्रवेश करून अर्धनग्न अवस्थेत बेमुदत उपोषण सुरू केले. जोपर्यंत आपल्या प्रभागातील पाणीप्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आपण या जागेवरून हलणार नाही अशी भूमिका उगले यांनी घेतली. आयुक्त दालनाबाहेरील सुरक्षा अधिकारी सरिता चरेगावकर यांनी उगले यांना तेथून जाण्यास सांगितले. मात्र त्यांनी नकार दिला. त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात मोहन उगले यांच्याविरुद्ध तक्रार केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सत्ताधाऱ्यांवर कपडे काढण्याची वेळ हे मोठे दुर्दैव

खोके सरकारच्या कार्यकाळात विकासकामे ठप्प झाली आहेत. प्रशासनावर या सरकारचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. प्रशासनाचा वेळ फक्त नेत्यांची तळी उचलण्यात जात आहे. त्यामुळेच सत्ताधारी गटाच्या माजी नगरसेवकावर महापालिका मुख्यालयात कपडे काढण्याची वेळ आली असून हे फार मोठे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया आता राजकीय वर्तुळात उमटू लागली आहे.