बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल मेहता यांचे आज निधन झाले. अनिल हे बाल्कनीमधून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असली तरी या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे. हा अपघात होता की अनिल मेहता यांनी आत्महत्या केली, अशी चर्चा सुरू झाली आहे. लवकरच वांद्रे पोलीस हे अरोरा कुटुंबीयांचा जबाब नोंदवणार आहे. जबाब नोंदवल्यानंतर काही बाबींचा उलगडा होणार आहे.
80 वर्षीय अनिल मेहता हे वांद्रे येथील अलमेडा पार्क येथे राहत होते. त्याने पूर्वी मर्चंट नेव्हीमध्ये काम केले होते. आज सकाळी अनिल हे सहाव्या मजल्यावर उभे होते. अचानक ते सहाव्या मजल्यावरून खाली पडले. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला. स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी अनिल यांना मृत घोषित केले. अनिल यांच्या घराच्या बाल्कनीच्या ग्रीलची उंची कमी आहे. त्यामुळे ते पडले असावे असे बोलले जात आहे. अनिल यांच्या मृत्यूची माहिती समजताच मलायका पुण्याहून मुंबईला निघाली. तसेच अनिल यांच्या अपघाती मृत्यूची माहिती समजताच लेखक सलीम खान आणि अभिनेता अरबाज खान, अभिनेत्री करीना कपूर आदी बॉलिवूडचे कलाकार हे अनिल यांच्या निवासस्थानी गेले होते.
या घटनेची माहिती समजताच फॉरेन्सिक लॅबचे एक पथक घटनास्थळी आले होते. या प्रकरणात प्रत्येक पैलू तपासला जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर काही बाबींचा उलगडा होणार आहे. गेल्या वर्षी अनिल यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते असे सूत्रांनी सांगितले.