महाविजयाची हॅटट्रिक, मलेशियाचा धुव्वा उडवत हिंदुस्थान उपांत्य फेरीत; राजकुमार पालने ठोकली गोलांची हॅटट्रिक

गतविजेत्या हिंदुस्थानने आपल्या लौकिकास साजेसा अफलातून खेळ करीत आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत महाविजयाची हॅटट्रिक साजरी केली. यजमान चीन व जपान यांना धूळ चारल्यानंतर हिंदुस्थानने बुधवारी मलेशियाचाही 8-1 गोलफरकाने धुव्वा उडवीत उपांत्य फेरीत धडक दिली. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा हिंदुस्थान हा पहिला संघ ठरलाय.

हिंदुस्थानच्या या एकतर्फी विजयात राजकुमार पालने हॅटट्रिकचा पराक्रम केला. त्याने तिसऱ्या, 25 व्या व 33 व्या मिनिटाला गोल करून मलेशियाची संरक्षण फळी निप्रभ ठरविली. याचबरोबर अराईजीतसिंग हुंडल यानेही सहाव्या व 39 व्या मिनिटाला गोल करीत विजयात आपला वाटा उचलला. शिवाय जुगराज सिंहने सातव्या, हरमनप्रीत सिंगने 22 व्या, तर उत्तम सिंगने 40 व्या मिनिटाला गोल करून मलेशियाची दाणादाण उडविली.

मलेशियाकडून अखिमुल्लाह अन्वर याने 34 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. हिंदुस्थानने मध्यंतरापर्यंतच 5-0 अशी जोरदार मुसंडी मारली होती. येथेच हिंदुस्थानने अर्धी लढाई जिंकली होती. त्यानंतर गर्भगळीत झालेल्या मलेशियाला लढतीत पुनरागमन करणे शक्य झाले नाही.

गुणतक्त्यात हिंदुस्थान अव्वल

हिंदुस्थानी संघाने विजयाच्या हॅटट्रिकसह 9 गुणांची कमाई करीत स्पर्धेच्या गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविले. हिंदुस्थानी खेळाडूंनी आतापर्यंत 16 गोल केले असून, त्यातील 11 मैदानी गोल आहेत. कोरिया एक विजय आणि दोन ड्रॉसह 5 गुणांची कमाई करीत दुसऱ्या, तर पाकिस्तान (5 गुण) व चीन (3 गुण) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत. जपान व मलेशिया प्रत्येकी एका गुणासह अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी आहेत. सहा संघांमधील ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जात आहे. स्पर्धेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. 16 सप्टेंबरला उपांत्य फेरी होणार असून अंतिम लढतीचा थरार 17 सप्टेंबरला रंगणार आहे.