Yavatmal News – दोन वर्षांपासून फरार आरोपीला पुसद शहरातून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

प्रतिबंधित औषधांची विक्री केल्याचा आरोप असलेल्या फरार आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या पथकाने यवतमाळमध्ये ही कारवाई केली आहे. करणसिंग टूरलासिंग जस्सोल असे अटक आरोपीचे नाव आहे. करणसिंग गेल्या दोन वर्षापासून फरार होता. अखेर यवतमाळच्या पुसद शहरातून त्याला अटक करण्यात आली आहे.

करणसिंग हा मूळचा राजस्थानचा असून त्याने प्रतिबंधित औषधे डॉक्टरांच्या चिट्ठीविना विक्री केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी करणसिंग विरोधात काळबादेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला. गेली दोन वर्षे पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात करणसिंग असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ पुसद शहर गाठले आणि NDPS अंतर्गत कारवाई करत आरोपीची गठडी वळली.

करणसिंग हा पुसद शहरातील कोटा अकॅडमीमध्ये मागील एक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत होता. आरोपीला अटक करून पुसद शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.