नगरमध्ये पुन्हा बिबट्याचा हल्ला, महिलेला घरापासून शेतात फरफटत नेले

नगरमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढत चालले आहेत. तालुक्यातील निमगाव टेंभी येथील महिलेला बिबट्याने शेतात ओढत नेले. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी महिलेचा मृत्यू झाला आहे. संगीता वर्पे असे मयत महिलेचे नाव आहे. आज सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

संगीता वर्पे यांच्यावर बिबट्याने हल्ला करताच त्या मोठ्याने किंचाळल्या. वहिनीचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचे दीर प्रवीण वर्पे यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी बिबट्या त्यांना शेतात ओढत नेत असल्याचे दिसले. प्रवीण यांनी मदतीसाठी आरडाओरड केला असता जवळच असलेले तीन ते चार जण मदतीसाठी धावले.

लोकांचा आरडाओरडा ऐकून बिबट्याने धूम ठोकली. यानंतर जखमी अवस्थेत संगीता यांना औषधोपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती कळताच उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी धाव घेत माहिती घेतली. या नरभक्षक बिबट्याच्या दहशतीमुळे निमगाव टेंभी येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.