अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा (वय – 62) यांनी आत्महत्या केली आहे. मुंबईतील वांद्रे येथील इमारतीच्या छतावरून उडी घेत त्यांनी जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवारी सकाळी 9 च्या सुमारास घडली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी बाबा हॉस्पिटलमध्ये पाठवला. तसेच फॉरेन्सिकचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहेत, अशी माहिती डीसीपी राज तिलक रोषन यांनी दिली.

अनिल अरोरा हे मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होते. निवृत्तीनंतर ते मुंबईतील वांद्रे येथे आशा मैनार नावाच्या इमारतीमध्ये रहात होते. बुधवारी सकाळी 9 च्या सुमारास त्यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धाव घेतली. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. दरम्यान, वडिलांनी टोकाचे पाऊल उचल्याची माहिती मिळाली तेव्हा मलायका पुण्यामध्ये होती. माहिती मिळताच ती तत्काळ मुंबईकडे रवाना झाली आहे. तसेच तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान यानेही अरोरा कुटुंबाकडे धाव घेतली आहे.

अनिल अरोरा हे गेल्या काही काळापासून आजारी होते. गेल्या वर्षी वैद्यकीय कारणांमुळे त्यांना उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी आई जॉइससह मलायकाही रुग्णालयात दिसली होती. त्यांना नक्की काय आजार झाला होता ते समोर आले नव्हते.

अनिल अरोरा यांचाजॉइस पॉलीकॉर्प यांच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला मलायका आणि अमृता नावाच्या दोन मुली आहेत. मयालका 11 वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता.