‘सब का साथ, सब का विकास’मुळे मळमळायला लागलं, मोदींनी पंतप्रधान पद सोडावं आणि… शरद पोंक्षेंचं मोठं विधान

लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला नकारले आहे. या आधी स्वबळावर सत्तेत असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी एनडीच्या कुबड्यांची गरज भासली आहे. तसेच मणिपूरसह अनेक मुद्द्यांवर संघानेही भाजपला चांगलेच सुनावले आहे. त्यातच आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी हिंदुत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायउतार व्हावे, असे विधान केले आहे. तसेच ‘सब का साथ, सब का विकास’मुळे मळमळायला लागलं, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. सांगलीतील एका कार्यक्रमात पोंक्षे यांनी याबाबतचे मत व्यक्त केले.

आतापर्यंत आपल्या देशावर अनेकांनी आक्रमणे केली. मात्र, कोणालाही हिंदू धर्म संपवता आला नाही. हे सत्य असले तरी आता या कल्पनेत कायम राहू नये. देशाला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पायउतार होण्याची गरज आहे. मोदींनी पायउतार होत देशाचं नेतृत्व हे योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावं, असं मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं. ‘भारत: काल, आज आणि उद्या’ या विषयावर त्यांनी हे मत व्यक्त केले.

मुस्लिमांना त्यांच्या हक्काची अनेक राष्ट्रं आहेत. हिंदू धर्मासाठी भारत हा एकच देश आहे. इथून हाकललं तर आसरा घ्यायला आपल्याला दुसरं राष्ट्र नाही. त्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं नेतृत्व योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावं असं मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं. ‘सब का साथ, सब का विकास’ यामुळे आता मळमळायला लागलं आहे असं शरद पोंक्षे म्हणाले. एबीपी माझानं यासंदर्भातील एक वृत्त प्रसिद्ध केलं असून यासोबत पोंक्षे यांच्या अधिकृत हँडलवरील पोस्ट देखील शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

हिंदूंना संपवण्यासाठी जाती-जातींमध्ये विष पेरलं जात आहे. आपण यापासून दूर राहून सनातनी संस्कृती टिकवायला हवी. ज्या क्षणी आपण 49 टक्क्यांवर आलो त्या क्षणी आपला देश संपेल. निसर्गाने ज्याला बनवलंय त्याला कुणी संपवू शकत नाही. हा निसर्गच निसर्गाला संपवेल, माणूस नाही. चौथ्या पाचव्या शतकापासून देशावर अनेक आक्रमणं झाली. पण कुणाच्यात धमक झाली नाही हिंदू राष्ट्र संपवण्याची. कुणालाही जमलं नाही. मात्र, आता या कल्पनेत कायम राहू नये. अखंड सावध असावे असं समर्थ म्हणतात, असेही पोंक्षे यांनी सांगितले.