रस्त्यासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचा ठेकेदाराने केला ‘गेम’, कल्याण-डोंबिवली पालिकेचा भ्रष्ट कनिष्ठ अभियंता निलंबित

कामाच्या बदल्यात ठेकेदाराकडून लाच स्वीकारणाऱ्या कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. संजय सोमवंशी असे अधिकाऱ्याचे नाव असून ते महापालिकेच्या दक्षता आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या कनिष्ठ अभियंता तथा प्रयोगशाळा सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. काँक्रीट रस्ता आणि गटाराच्या कामाच्या गुणवत्ता तपासणीसाठी सोमवंशी यांनी लाच स्वीकारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सोमवंशी यांना तडकाफडकी निलंबित केले.

कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात निकृष्ट दर्जाची विकासकामे सुरू असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. त्यातच पालिकेचे दक्षता आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधिकारी संजय सोमवंशी ठेकेदाराकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडिया व माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संतापाची लाट पसरली आहे. मात्र या व्हिडीओनंतर आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी तत्काळ कारवाईचा बडगा उगारत अभियंता सोमवंशी यांना सेवेतून निलंबित केले आहे. तसेच त्यांची विभागीय चौकशी लावण्याचे आदेशदेखील आयुक्तांनी दिले आहेत.

भिवंडीत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून राज्यात संतापाची लाट पसरली आहे. त्यातच आता भिवंडीत दोन दिवसांत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. साईबाबा मंदिर परिसरातील स्टेम वॉटर सप्लायर्स परिसरातील 14 वर्षीय मुलगी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शानदार मार्केट परिसरात गेली परंतु घरी परतली नाही. तर दुसरीकडे अंजूरफाटा रामनगर परिसरातील 16 वर्षीय मुलगी ही सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर निघाली मात्र ती घरी परत आली नाही. या दोघींच्या नातेवाईकांनी त्यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.

चोरट्यांना अटक; 10 गुन्ह्यांची उकल

नवी मुंबईसह ठाणे परिसरात घरफोडी आणि वाहनांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखा घटक ५ च्या पथकाला यश मिळाले आहे. अर्जुन मल्होत्रा, आदित्य सोंडकर व निखिल माने अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी 10 गुन्ह्यांची उकल केली असून 75 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल व 3 दुचाकी जप्त केल्या आहेत. ठाण्यातील कापूरबावडी परिसरात चोरी केल्यानंतर या तिघांनी पोबारा केला. कापूरबावडी पोलिसांसह गुन्हे शाखा घटक 5 चे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने या तिघांचा शोध घेतला असता ते सातारा येथे लपून बसल्याची माहिती त्यांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी सातारा येथे सापळा रचून या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. हे तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.