अजित पवारांकडून खुलासेच खुलासे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे दौऱ्यात खुलासे करत बसावे लागले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर आपली कापूस, सोयाबीन, कांद्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. मी त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद मागितले. विधानसभा निवडणुकीनंतर बिहार पॅटर्न राबवा, अशी मागणी केल्याच्या वृत्तामध्ये सत्य नसल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला. अमित शहा यांच्याबरोबर निवडणुकीची चर्चा झाली नाही, असे स्पष्ट करून अजित पवार म्हणाले, ‘शहा यांच्याबरोबर चर्चेत कांदा निर्यात बंदी करू नये, अशी भूमिका आपण मांडल्याचे सांगितले.’

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त करावयाच्या जागांच्या यादीत अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे नाव घेतल्यावरून वाद निर्माण झाला. या वादावर स्पष्टीकरण देताना अद्याप कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. नावांची यादी तुमच्याकडूनच कळली, अशी सारवासारव त्यांनी केली. अजित पवार हे पुण्यातील सर्किट हाऊसच्या दिशेने जात असताना सकाळी साडेसहा वाजता संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकीस्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला. हा अपघात अजित पवार यांच्या समोरच झाल्याने अजित पवार यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली. पवार यांनी दिवसभर शहरातील प्रमुख गणेश मंडळांना भेट दिली.