कैदी बनवत असलेल्या लाकडी, फर्निचरची जोरदार चलती; मोठ्या प्रमाणात मागणी

आपले घर अथवा कार्यालय आकर्षक व मजबूत फर्निचरने सजलेले असावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी मग शहरातील नामांकित दुकानातून नक्षीकाम अथवा वेगळ्या धाटणीतले फर्निचर सढळ हस्ते खरेदी केले जाते. असे असताना कारागृहात कैद्यांनी बनवलेले लाकडी फर्निचरदेखील विशेष ‘भाव’ खात आहे. शासकीय संस्था तसेच नागरिकांकडून कारागृहात बनवलेल्या लाकडी वस्तूंना मोठी मागणी होत असून त्यातून कारागृह प्रशासनाला चांगला महसूलदेखील मिळत आहे.

राज्यातील आठ मध्यवर्ती कारागृहांमध्ये उद्योग विभागांतर्गंत विविध साहित्य, वस्तू, खाद्यपदार्थ आदी बनवले जाते. या आठ कारागृहांमध्ये कैद्यांच्या मार्फत जवळपास 65 प्रकारचे साहित्य बनवले जाते. परंतु कारागृहाचा सुतारकाम विभागाचा बोलबाला  आहे. या विभागात बनविण्यात येणारे लाकडी फर्निचर सर्वांच्याच पसंतीस उतरत असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामध्ये सागवान लाकडापासून बनविलेल्या के आकाराच्या खुर्च्या, आरामखुर्च्या, स्टूल, चौरंग या वस्तूंना विशेष मागणी असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. शासकीय- निमशासकीय संस्थांव्यतिरिक्त नागरिकांकडूनही कैद्यांनी बनविलेल्या आकर्षक व मजबूत लाकडी फर्निचरची खरेदी केली जात आहे. याशिवाय हातमाग विभागात बनविण्यात येणाऱ्या वस्तूंनाही चांगली पसंती मिळत आहे. कैद्यांनी बनविलेल्या सुबक गालीचे, दरी, पैठणी साडी, सुती टॉवेल यांनाही मोठी मागणी असल्याचे सांगण्यात येते.

गणेशोत्सवामध्ये नाशिक कारागृहात कैद्यांनी बनविलेल्या गणरायाच्या आकर्षक व सुबक मूर्तींची भक्तांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. नाताळ व नवीन वर्षांनिमित्त ठाण्याच्या बेकरी विभागात बनविण्यात येणारे केक, खुसखुसीत बिस्किटे आणि अन्य पदार्थांना मोठी मागणी असते. विशेष म्हणजे बाजारात नामांकित दुकाने उपलब्ध असतानाही कैद्यांनी बनविलेल्या वस्तू नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. यामुळे कारागृहाकडे चांगला महसूल जमा होत आहे.

कारागृहाबाहेर होतो फायदा

कारागृहात असताना कैद्यांना त्यांच्या आवडीनुसार विविध कामे शिकवली जातात. त्यासाठी त्यांना तज्ञांकडून आवश्यक मार्गदर्शन केले जाते. यामुळे पैदी विविध कला आत्मसात करतात आणि कारागृहाबाहेर गेल्यानंतर त्यांना स्वतःचा व्यवसाय अथवा चांगल्या ठिकाणी नोकरी करण्यास फायदा होत असल्याचे कारागृह अधिकाऱ्याने सांगितले.