महाराष्ट्रातील प्रकल्पानंतर आता क्रिकेटची स्पर्धाही पळवली, इराणी करंडक स्पर्धा आता मुंबईऐवजी लखनौमध्ये होणार

मिंधे सरकारच्या राजवटीत महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला पळविण्यात आले. प्रकल्पांनंतर आता इराणी करंडक ही क्रिकेटची महत्त्वाची स्पर्धाही राज्याबाहेर पळविण्यात आली आहे. पावसाचे कारण सांगून मुंबईत होणारी ही स्पर्धा आता लखनौमध्ये होणार आहे.

यंदाच्या हंगामातील इराणी करंडक क्रिकेट स्पर्धा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार होती, मात्र आता ती भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियम, लखनौ येथे होणार आहे. 1 ते 5 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या इराणी करंकड सामन्याची यजमानी अधिकृतपणे मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला देण्यात आली होती. मान्सून प्रदीर्घ काळ सक्रिय राहणार असल्याने ‘बीसीसीआय’ने आता ते लखनौमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. सततच्या पावसामुळे मुंबईची परिस्थिती या सामन्याच्या आयोजनासाठी योग्य नाही. या कारणास्तव बीसीसीआयने लखनौतील एकना स्टेडियम हे नवीन ठिकाण म्हणून निवडले आहे.

मुंबई-शेष हिंदुस्थान यांच्यात जेतेपदाची लढत

इराणी करंडकात यंदा रणजी ट्रॉफी जिंकणारा मुंबई संघ आणि शेष हिंदुस्थान एकमेकांना भिडणार आहेत. यंदा रणजीच्या अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव करत 42 व्यांदा ट्रॉफी जिंकली होती. शेष हिंदुस्थानने इराणी चषक स्पर्धेत 61 सामने खेळले असून आणि 30 वेळा जिंकले आहेत. त्याचबरोबर मुंबई संघाने 29 पैकी 14 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. यावेळी मुंबईला 15 व्यांदा विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असेल.