सरकारी अधिकारी केंद्रीय मंत्र्यांच्या पायजम्याची नाडी बांधतोय आणि त्यांचे बूट काढतोय असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारे केंद्रीय कोळसा राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे असल्याचा दावा करण्यात आला आहे. झारखंडच्या दौऱ्यावर असताना ते भारत कोकिंग कोल लिमिडेटच्या (बीसीसीएल) प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी धनबादमध्ये आले असताना हा प्रकार घडला आहे.
केंद्रीय मंत्री एका सोफ्यावर आरामात बसलेले असून बीसीसीएलचे अधिकारी त्यांचा बूट काढताना दिसतोय. एवढेच नाही तर हा अधिकारी मंत्र्यांच्या ढिल्या झालेल्या पायजम्याची नाडीही बांधतो, असा दावा करण्यात आला आहे. यानंतर विरोधक आक्रमक झाले असून सरकारवर टीकेची राळ उठली आहे. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.
Controversy erupts after the video of a senior BCCL official was seen removing Union Minister of State for Coal, Satish Chandra Dubey’s shoes and tightening his pajama during his visit to review several coal projects in Dhanbad, Jharkhand.#DY365 #SatishChandraDubey #Jharkhand pic.twitter.com/2qqD5ZGJKT
— DY365 (@DY365) September 9, 2024
केंद्रीय कोळसा राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे हे रविवारी झारखंडच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी धनबाद येथे बीसीसीएलच्या प्रकल्पांची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान बीसीसीएलच्या महाव्यवस्थापकांनी दुबे यांचा बूट काढला, त्यांच्या पायजम्याची नाडी बांधली असा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकावर टीकेची झोड उठवली.
काँग्रेसने हा प्रकार लज्जास्पद असल्याचे म्हटले. तसेच बीसीसीएलचे अधिकारी त्यांनी केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना खूश करत असल्याचा आरोपही केला. एखाद्या महाव्यवस्थापकाने मंत्र्यांच्या पायातील जोडे काढणे ही लाजिरवाणी बाब आहे. बीसीसीएलचे अधिकारी भ्रष्टाचारात गुंतलेले असून तो लपवण्यासाठी अशा पद्धतीने मंत्र्यांना खूश केले जात आहे, असे धनबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष सिंह यांनी म्हटले.
बीसीसीएलचे स्पष्टीकरण
प्रकरण चांगलेच तापत असल्याचे दिसताच बीसीसीएलने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर केले जाणारे दावे निराधार आणि दिशाभूल करणार आहेत, असे बीसीसीएलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बीसीसीएलचे अधिकारी हेडलॅम्प बॅटरी वाहून नेण्यासाटी वापरल्या जाणाऱ्या बेल्टच्या दुरुस्तीसाठी दुबे यांची मदत करत होते. खानकामाशी संबंधित नियमांनुसार खाणीत प्रवेश केल्यानंतर खाणीतून बूट, हेल्मेट, हेडलॅम्प, बॅटरी, बेल्ट आणि काठी इत्यादी सर्व वस्तू मोजल्या जातात आणि पुन्हा स्टोअरमध्ये जातात, असे अधिकाऱ्यांनी म्हटले.