एनडीए सरकारच्या काळात अनेक बांधकामांचे लोकार्पण झाल्यानंतर निकृष्ट कामांमुळे त्यांची पडझड सुरू झाली. आता देशभरातील पुरातन वास्तू, गडकिल्ले तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या वास्तूंकडेही एनडीए सरकारकडून दुर्लक्ष होत असून त्यांना उतरती कळा लागल्याचे उघड झाले आहे.
मुसळधार पावसामुळे जागतिक वारसा स्थळातील पर्यटन स्थळ असलेल्या ताजमहालच्या तीन घुमटांपैकी मुख्य घुमटातून पाण्याची गळती सुरू झाल्याचे भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे. त्यामुळे अशा वारसा स्थळांच्या डागडुजीचा आणि देखभालीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेश आणि आग्रा येथे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्यामुळे ताजमहाल परिसरात पाणीच पाणी झाले. गुरुवारी ताजमहाल परिसरातील उद्यानात पाणी साचल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पताजमहालने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले.
ताजमहालच्या मुख्य घुमटातून गळती सुरू झाल्याचे वृत्त वाऱयासारखे पसरताच अद्याप ताजमहालचे कोणतेही नुकसान झालेले नाही, अशी सावध भूमिका पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांनी घेतली.