गणरायापाठोपाठ मंगळवारी गौरींचे आगमन होणार आहे. सासरी गेलेली लेक जशी माहेरी येते तशी गौराई माहेराला येणार. आली गवर आली, सोनपावली आली… असे म्हणत घरोघरी तिचे स्वागत होईल. गौराईच्या पाहुणचारात कुठेही कमी राहू नये यासाठी मार्केटमध्ये खरेदीचा उत्साह आहे. कीर्तिकर मार्केट, दादरचे रानडे रोड, क्रॉफर्ड मार्केट, विलेपार्ले मार्केट येथे खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली.
या वर्षी मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजून 2 मिनिटांपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रामध्ये राहणार आहे. म्हणून मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी रात्री 8-02पर्यंत ज्येष्ठा गौरी आणाव्यात. बुधवार, 11 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन करावे. गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी रात्री 9.51पर्यंत मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करावे, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
ज्येष्ठा गौरी म्हणजे गणेशाची माता पार्वती! पार्वतीबरोबर तिच्या सखीचेही पूजन करण्याची प्रथा आहे. काही घराण्यात खडय़ाच्या गौरी आणतात, काही घराण्यात धान्याच्या राशीवर मुखवटे ठेवून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी तेरडय़ाच्या गौरी पूजतात. गौरीच्या सणाला सासरी गेलेली मुलगी माहेरी येते. गौरीला 16 प्रकारचे नैवेद्य, 16 प्रकारच्या भाज्या अर्पण करतात.
फळा-फुलांना मागणी
गौरी सजवण्यासाठी लागणारी फुले, वेण्या तसेच तिच्या प्रसादासाठी फळे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी आहे. गौरीसाठी वेण्या 30 रुपयांपासून उपलब्ध आहेत. चाफ्याचे फूल 10 ते 12 रुपये दराने विकले जात आहे. तर फळांचे दर चढे आहेत. गौरीला सजवण्यासाठी साडी, दागिने यांची खरेदी होतेय. नऊवारी, सहावारी रेडीमेड साडय़ाही बाजारात उपलब्ध आहेत. फेटाधारी गौरीचे मुखवटे यंदाचे आकर्षण आहे. मंगळसूत्र, पंठी, बोरमाळ, लक्ष्मीहार, कमरपट्टा अशा पारंपरिक दागिन्यांकडे महिलांचा कल आहे.