पुनर्विकसित इमारतीत दोन घरे देण्याचा करारनामा विकासकाने केला होता, मात्र प्रत्यक्षात रहिवाशाला दोनऐवजी एकच घर देऊन बनवाबनवी करणाऱ्या विकासकाला म्हाडाने चांगलाच दणका दिला. फिटनेस सेंटरची जागा कमी करून उपलब्ध जागी घर देण्यात यावे व त्या बदल्यात अर्जदाराकडून चटई क्षेत्राचे शुल्क घ्यावे, असे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. ‘म्हाडा’मध्ये आयोजित सहाव्या लोकशाही दिनात सोमवारी नऊ अर्जांवर सुनावणी झाली.
यात अंधेरी पश्चिम येथील वंदना शर्मा यादेखील सहभागी झाल्या होत्या. पुनर्विकसित इमारतीत विकासकाने दोन सदनिका देण्याचा करारनामा केला असताना विकासकाने आपल्याला एकच सदनिका दिली, अशी कैफियत त्यांनी लोकशाही दिनात मांडली. या अर्जावर सुनावणी देताना वंदना शर्मा यांना दुसरी सदनिका मिळण्यासाठी इमारतीच्या नकाशात बदल करावा. इमारतीत असलेल्या फिटनेस सेंटरची जागा कमी करून उपलब्ध जागी सदनिका देण्यात यावी व त्याबदल्यात अर्जदाराकडून चटई क्षेत्राचे शुल्क घ्यावे, असे निर्देश संजीव जयस्वाल यांनी दिले.
35 वर्षांनंतर घर नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी
म्हाडाच्या लोकशाही दिनात मिलिंद रेलेदेखील सहभागी झाले होते. 35 वर्षांपासून रखडलेला घराच्या नियमितीकरणाचा त्यांचा प्रश्न यावेळी मार्गी लागला. मिलिंद रेले यांनी केलेल्या अर्जप्रकरणी सुनावणीवेळी डी. एन. नगरमधील एका गृहनिर्माण संस्थेतील दिवंगत सदस्य बी. एस. रेले यांच्या नावे असलेले घर त्यांच्या वारसांच्या नावे नियमितीकरण करण्याचे निर्देश संजीव जयस्वाल यांनी दिले. या निर्णयामुळे रेले कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.