लोकसभा निवडणूक निकालानंतर अगदी काही मिनिटांतच हिंदुस्थानात कुणालाही भाजपा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भीती वाटेनाशी झाली. लोक आता मोदींना घाबरत नाहीत, असा जोरदार हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चढवला. हे राहुल गांधी किंवा काँग्रेसचे यश नसून लोकांचे यश आहे. राज्यघटनेवर, धर्मिक स्वातंत्र्यावर झालेला हल्ला सहन करणार नाही, हीच आता लोकांची भूमिका आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपा व नरेंद्र मोदींना लक्ष्य केले.
अमेरिकेच्या दौऱयावर असलेले राहुल गांधी डलास येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी भारतीय राजकारण, लोकसभा निवडणुकीचे परिणाम, भाजपाची पीछेहाट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी यावर भाष्य केले. देशाच्या राज्यघटनेवर हल्ला सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी या वेळी एनडीए सरकारला दिला. जेव्हा मी राज्यघटना हातात धरतो तेव्हा लोकांना कळते की, मला काय म्हणायचे आहे. भाजपा आमची संस्पृती, भाषा, राज्ये आणि इतिहासावर आक्रमण करत असल्याचे लोक सांगतात. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना हे कळले की जो कुणी राज्यघटनेवर हल्ला करत असेल तो त्यांच्या धार्मिक प्रथा-परंपरांवर हल्ला करत आहे, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
निवडणूक काळात लढा मूर्त स्वरुपात आला
प्रत्येकाला त्याची जागा मिळायला हवी, हा लढा निवडणूक काळात मूर्त स्वरुपात आला. देशाचे पंतप्रधान राज्यघटनेवर हल्ला करत आहेत हे तेव्हा लाखो लोकांना स्पष्टपणे दिसले. संघराज्य, भाषा, धर्म, संस्पृती आणि जातीचा आदर हे सगळे राज्यघटनेत आहे. यातील प्रत्येक शब्द राज्यघटनेत आहे. त्यामुळेच मी तुम्हाला हे सगळे सांगतोय, असेही राहुल गांधी यांनी या वेळी सांगितले. सर्वांवर झालेला हल्ला म्हणजे राज्यघटनेवरचा हल्ला असल्याची भूमिका राहुल गांधी यांनी या वेळी मांडली.4
आरएसएसला वाटतेय की भारत ही एक कल्पना आहे
आरएसएसला वाटतेय की भारत ही एक कल्पना आहे. आम्हाला वाटते की भारत म्हणजे अनेक प्रकारच्या कल्पना आहेत. आम्हाला वाटते की प्रत्येकाला सहभागी घेण्याची संधी मिळायला हवी, स्वप्न पाहण्याची संधी मिळायला हवी. जात, धर्म, भाषा, संस्पृती, इतिहास या आधारावर भेदभाव न करता प्रत्येकाला त्याची जागा मिळायला हवी आणि हा खरा लढा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
संसदेतील भाषणात जेव्हा मी अभय मुद्रा दाखवली आणि देशातील प्रत्येक धर्मात हात हे अभयाचे प्रतीक आहे असे सांगितले तेव्हा भाजपाला ते सहन झाले नाही. त्यांना ते समजलेच नाही. पण आपण त्यांना हे समजावून सांगणार. गुरू नानक, जिजस क्राइस्ट, भगवान बुद्ध, भगवान महावीर, सर्वांच्या पह्टोत अभय मुद्रा दिसेल. ते सर्व सांगतात घाबरू नका आणि घाबरवूही नका.