वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या यानिक सिनरने आपल्या वर्षाचा शेवट अमेरिकन ओपन जिंकून केला. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या यानिक सिनरने अमेरिकन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावताना अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचा 6-3, 6-4, 7-5 असा सहज पराभव केला. वर्षातील शेवटचे ग्रॅण्डस्लॅम जिंकणारा तो पहिला इटालियन पुरुष खेळाडू ठरला आहे. तसेच 23 वर्षीय सिनरने एकाच वर्षी दोन ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचाही पराक्रम केला.
सिनरसाठी हे वर्ष खूपच जबरदस्त होते. त्यामुळे विजयानंतर त्याने आपल्याला पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा होता. टेनिस हे माझ्यासाठी सर्वकाही असल्याचीही भावना व्यक्त केल्या आणि आपल्याला असेच पाठिंब्याचे बळ देत रहा, अशीही अपेक्षा सिनरने व्यक्त केली.
अंतिम सामना अपेक्षित रंगलाच नाही. 2 तास 16 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिनरचेच वर्चस्व दिसून आले. त्याने पहिला सेट 6-3 असा जिंकला. त्यानंतर दुसरा सेट 6-4 असा जिंकून आघाडी घेतली आणि शेवटचा सेट 7-5 असा जिंकून सामना जिंकला.
तब्बल 18 वर्षांनंतर अमेरिकन अंतिम फेरीत
अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला आपले पहिले ग्रॅण्डस्लॅम पटकावता आले नाही. तब्बल 18 वर्षांनंतर एका अमेरिकन टेनिसपटूला आपल्या घरच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आली. त्याआधी अॅण्डी रॉडिकला 2006 मध्ये हे यश मिळवता आले होते. 2003 सालापासून ही स्पर्धा एकाही अमेरिकनला जिंकता आलेली नाही. रॉडिकनेच 2003 साली या स्पर्धेचे अखेरचे जेतेपद संपादले होते. त्याआधी आंद्रे अगासी, पीट सॅप्रस यासारख्या दिग्गजांचे या स्पर्धेवर वर्चस्व होते.